मडगाव,दि. ६ (प्रतिनिधी) - शनिवारी सकाळी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतींतील ग्लोबल इस्पात कारखान्याच्या भट्टीच्या झालेल्या स्फोटात गंभीर झालेल्या दुसऱ्या कामगारालाही आज गोमेकॉत मृत्यू आला व त्यामुळे बळींची संख्या दोन झाली आहे.
मरण पावलेल्या कामगाराचे नाव राजेशकुमार असे आहे. स्फोट झाला तेव्हा तो बॉयलरवर असलेल्या क्रेनवर होता व स्फोटामुळे उसळलेला लोहरस अंगावर पडून अक्षरशः कोळसा झालेला होता असे कळते. त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून तो शवागारात ठेवलेला आहे. काल मरण पावलेल्या सुरेश रामप्रसाद शर्मा व त्याचा मृतदेह उद्या त्यांच्या मूळगावी उत्तर प्रदेशकडे रवाना केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. गोमेकॉत असलेल्या ज्योती गावकर यांची प्रकृती आता सुधारत आहे.
पोलिसांनी सदर कारखाना सील करून तपास सुरु केला आहे. कारखाना चालकांविरुध्द सुरक्षा उपायात गलथानपणा व हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून अटक केलेले चालक अभयकुमार अग्रवाल व कुशल अग्रवाल तसेच व्यवस्थापक अजयकुमार गोयल यांना नंतर जामिनावर मुक्त केले आहे. या कारखान्याबद्दल कुंकळ्ळीत मात्र जनमत खदखदत असून यापूर्वी तेथे असे अनेक प्रकार घडल्याचा व व्यवस्थापनाने ते दडपून टाकल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरु केला आहे.
Tuesday, 7 July 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment