Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 8 July 2009

लोहरसाशी पाण्याचा संपर्क आल्यानेच स्फोट?

मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी): गेल्या शनिवारी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील ग्लोबल इस्पात या लोहप्रकल्पातील भट्टीत झालेला स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला याच्या नेमक्या निष्कर्षाप्रत एकही सरकारी यंत्रणा आलेली नसली तरी भट्टीतील वितळलेल्या धातूशी पाण्याचा संपर्क आल्यानेच हा महाभयानक स्फोट झाला याच तर्काला बळकटी मिळत आहे.
कंपनी व्यवस्थापनानेही असाच संशय व्क्त केलेला असला तरी आपल्या तर्काच्या पुष्ट्यर्थ कोणतेच पुरावे अद्याप कारखाने व बाष्पक निरीक्षणालयाला सादर केलेले नाहीत. पण वितळला जाणाऱ्या धातूमुळे निर्माण होणारा हैड्रोजनाचा पाण्यामुळे प्राणवायुशी संपर्क आला तर असा अनर्थ उदभवू शकतो असा जाणकारांचा कयास आहे. मात्र तेथे पाणी कसे आले याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार पाण्याबाबतचा धोका संबंधित स्वयंचलित यंत्रणे वरून मिळून भट्टी बंद करीपर्यंत विलंब झाला अन त्याची परिणती स्फोटंात झाली असे सांगण्यात येते.आता अग्निशामक दल, पोलिस व कारखाना व बाष्पक निरीक्षक अशा तीन यंत्रणा या स्फोटाची चौकशी करीत आहेत. सुरवातीला तेथील भंगारात असलेले रिकामे गॅस सिलिंडर पाहून त्यामुळे स्फोट झाला असा तर्क काहींनी लढविला होता, पण अशा प्रकल्पात भंगारातील असे सिलिंडर सर्रास वापरतात असे सांगण्यात आले व त्यामुळे ती शक्यता दुरावली.
पोलिस आता अग्निशामक दलाच्या अहवालाची तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या निष्कर्षाची प्रतीक्षा करीत आहेत. तर अग्निशामक दल कंपनी व्यवस्थापनाकडून तसेच कारखाना व बाष्पक निरीक्षणालय ठाम निष्कर्ष काढू शकेल या मताचे आहेत. व्यवस्थापनाने अजूनही समाधानकारक खुलासा केलेला नाही असे दलातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, या कारखान्यातील व्यवहार क ाल कुंकळ्ळी पोलिसांनी त्याच्या मुख्य फाटकाला टाळे ठोकून तो सील केल्यामुळे पूर्णतः थंडावले आहेत. तपासकामासाठी एक लहान गेट ठेवलेली असून तेथे सुरक्षा ठेवलेली आहे. सील करण्यापूर्वी पोलिसांनी स्फोट जागेचा तसेच तेथील ढिगाऱ्याचा पंचनामा केला गेला. नंतर तेथील वीज जोडणीही तोडण्यात आली. व्यवस्थापनाला आतील यंत्रसामुग्री व अन्य माल हलविता येऊ नये म्हणून हे सील ठोकण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

No comments: