Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 9 July 2009

पर्यटकांसाठी पेडणे ते दुधसागर रेलगाडी हवी

श्रीपाद नाईक यांची लोकसभेत मागणी

पणजी, दि. ८ - गोवा राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत, त्यापैकी दुधसागर धबधबा हे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे असंख्य देशीविदेशी पर्यटक जात असतात. त्यांच्यासाठी पेडणे ते दुधसागर अशी खास रेलगाडी सुरू करावी, अशी जोरदार मागणी उत्तर गोव्याचे भाजप खासदार श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत रेल्वे अंदाजपत्रकावरील चर्चेत भाग घेताना केली.
यापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी अनेक आश्वासने दिली होती, त्यापैकी मोजकीच पूर्ण झाली. खरे तर महत्वाची कामे प्राधान्यक्रमाने घ्यायला हवीत. विद्यमान रेल्वेमंत्र्यांनी ५० ठिकाणी जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा देण्याची घोषणा केली आहे, त्यात गोव्याचाही समावेश करावा अशी मागणी नाईक यांनी केली.
साऊथ वेस्टर्न रेल्वेतर्फे यापूर्वी गोव्यात हरिप्रिया एक्सप्रेस वास्को ते तिरुपती सुरू होती, वास्को मिरज ही रेलगाडीही चालू होती. हा मार्ग मीटर गेजचा ब्रॉडगेज झाल्यावर आता यापैकी एकही गाडी सुरू नसल्याचे श्रीपाद नाईक यांनी निदर्शनास आणून दिले. गोवा हे छोटे राज्य असले तरी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे, यासाठी रेल्वेने अधिक गाड्या गोव्यापर्यंत सुरू कराव्यात, असेही नाईक म्हणाले. शिर्डी हे अनेकांचे श्रद्धास्थान असल्याने तेथे रेल्वेस्टेशन असायला हवे, असे सांगून गोव्यातून हजारो भाविक तेथे जात असतात, असे ते म्हणाले. मडगाव ते शिर्डी अशी रेलसेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. मडगाव ते मुंबई, मडगाव ते बंगळूर, मडगाव ते तिरुपती, मडगाव ते जयपूर, मडगाव ते चेन्नई, विलकीणी ते कन्याकुमारी अशा येजा करणाऱ्या रेलगाड्यांची आवश्यकता गोव्याला असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. मये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रेल्वेने मार्ग करावा, अशीही मागणी नाईक यांनी केली. गेल्या महिन्याभरात घडलेल्या लुटमारीच्या घटनांकडे लक्ष वेधून श्रीपाद नाईक यांनी अधिक सुरक्षा पुरविण्याची मागणी आपल्या भाषणात केली.

No comments: