पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) : धार्मिक सलोखा जपणाऱ्या गोव्याची कॉंग्रेस सरकारच्या राजवटीत सर्वत्र बदनामी सुरू आहे. मडगावात झालेल्या दंगलप्रकरणी गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवतानाच सरकारमधील काही वजनदार नेत्यांकडूनच गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा सनसनाटी आरोप भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केला.
येत्या दिवसांत पोलिसांनी या गटाच्या लोकांना अटक केली नाही तसेच मोतीडोंगर येथील शस्त्रसाठ्याबाबत गुन्हेगारांना ताब्यात घेतले नाही तर उद्भवणाऱ्या परिणामांना पोलिस व सरकारच जबाबदार राहील असा इशाराही नाईक यांनी दिला. पणजीतील भाजप मुख्यालयात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे, सांग्याचे आमदार वासुदेव मेंग गावकर, माजी आमदार सदानंद शेटतानावडे, सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते.
नाईक यांनी आज आपल्या सहकाऱ्याबरोबर पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधी निवेदन सादर केले. गोव्यात केवळ राजकीय आश्रयामुळे सक्रिय बनलेल्या समाजकंटकांना आताच आळा घातला नाही तर शांतताप्रिय गोव्यातही जातीयवाद व कट्टरवादाची बिजे रोवली जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भाजपवर जातीयवादाचे आरोप करून या दंगलीनिमित्ताने भाजप कार्यकर्त्यांना सतावण्याचे अत्यंत घृणास्पद प्रकार पोलिसांकडून सुरू असल्याचा आरोप नाईक यांनी केला.
एका गटाच्या १८ जणांना अटक करून विरोधी गटातील एकूण २२ जणांविरोधात तक्रारी असूनही केवळ दोघांना ताब्यात घेतले गेल्याचेही ते म्हणाले. काल मोतीडोंगर येथे मिळालेल्या शस्त्रसाठ्यात सुरुवातीस ३० ते ५० तलवारी असल्याची माहिती मिळाली होती. नंतर अचानक पोलिसांनी खुलासा करून केवळ सतरा तलवारी असल्याचा खुलासा केला यावरून पोलिसांच्या भूमिकेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
नावेलीत झालेल्या भांडणाचे पडसाद मोतीडोंगर येथे एका धार्मिक स्थानी उमटतात याचा अर्थ काय, असा खडा सवाल करून पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी असे ते म्हणाले. या दंगलीत जखमी झालेल्या रुग्णांवर खुद्द हॉस्पिसियू इस्पितळात पेट्रोलबॉंबने हल्ला करण्याचा प्रकार गंभीर आहे. ही स्थिती आटोक्याबाहेर जात असल्याची माहिती त्यांनी दिली. हा हल्ला होण्यापूर्वी पोलिसांनी रुग्णांच्या नातेवाइकांना बसलेल्या जागेवरून उठवले व त्यानंतर लगेच तिथे हा हल्ला झाला हा काय प्रकार आहे, असा गंभीर सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी या एकूण प्रकरणी स्वीकारलेल्या मवाळ भूमिकेमुळे ही परिस्थिती अधिक चिघळणार असल्याची भितीही यावेळी व्यक्त करण्यात आली. पोलिस पूर्णपणे राजकीय दबावाखाली काम करीत असून त्यांची कार्यपद्धती संशयास्पद असल्याचा आरोपही यावेळी श्री. नाईक यांनी केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment