Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 4 July 2008

मडगावात तणाव; स्थिती नियंत्रणात

लोकांची पोलिस स्थानकावर धडक व रस्त्यावर धरणे
०अफवांचे पीक ० गांधी मार्केट व न्यू मार्केट बंदमुळे भीतीचे वातावरण०

मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यापासून मडगावात घडू लागलेल्या घटना व त्यांना तोंड देण्यास कमी पडत चाललेली पोलिस यंत्रणा याच्या निषेधार्थ शहरातील देशप्रेमी नागरिकांनी आज येथील पोलिस स्थानकावर मोर्चा काढला. तसेच भेटीची वेळ पक्की करूनही पोलिस अधीक्षकांनी ती न पाळल्याच्या निषेधार्थ लोकांनी पोलिस स्थानकासमोरील रस्त्यावर दिलेला ठिय्या दिला. पोलिस अधीक्षकांनी स्वतः येऊन म्हणणे आपले ऐकून घेतल्याखेरीज तेथून न हटण्याचा केलेला निर्धार नागरिकांनी केल्याने आज सायंकाळी शहरात पुन्हा तणाव निर्माण झाला. त्यातच गांधी मार्केटात अफवा पसरून गेल्या शुक्रवारचीच पुनरावृत्ती होणार या भयाने अगोदर गांधी मार्केट व नंतर न्यू मार्केटमधील दुकाने धडाधड बंद झाली. परिणामीे दंगलसदृश वातावरण दिसून आले.
शहरात तणावाची चिन्हे दिसताच दवर्ली, मोतीडोंगर भागात लगेच अतिरिक्त पोलिस कुमक तैनात केल्याने तेथील रहिवाशांमध्ये खळबळ माजली. मात्र अनुचित प्रकार घडला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
नागरिकांचा हा जमाव ठरल्या प्रमाणे ४ वा. पोलिस स्टेशनजवळ जमला होता त्यांचे नेतृत्व युवा नेते शर्मद पै रायतूरकर, सिद्धनाथ बुयाव, राजेंद्र वेलिंगकर, राजू पर्वतकर व इतरांनी केले. तथापि, ही मंडळी येत असल्याचे पाहून अधीक्षक प्रभुदेसाई हे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या गाडीतून निघून गेले. शर्मद यांनी नंतर त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता तातडीच्या बैठकीसाठी आपण पणजीला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस अधिकाऱ्यांच्या या कृतीचा निषेध करून जमाव पोलिस स्थानकावर चालून गेला . जमावांत महिलांचाही लक्षणीय समावेश होता. जमावाला पोलिस स्थानकाच्या दारातच निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई व धर्मेश आंगले यांनी अडवले व कोणीही १० जण जाऊन उप अधीक्षकांची भेट घेऊ शकता, असे सांगितले. मात्र निदर्शकांनी तो प्रस्ताव झिडकारला व अधीक्षकांनी वेळ ठरवूनही न थांबता लोकांचा अपमान केलेला असल्याने सर्वांना उपअधीक्षकांपर्यंत जाऊ द्यावे वा अधीक्षकांनी लोकांना सामोरे जावे असे दोन प्रस्ताव ठेवले. ते अमान्य झाले तेव्हा निदर्शकांनी पोलिस व सरकारविरोधी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
जमावाची संख्या वाढू लागली व त्याबरोबरच तणावाची लक्षणे दिसू लागल्याने उपविभागीय दंडाधिकारी दीपक देसाई यांना पाचारण केले गेले. त्यांनी येऊन निदर्शकांची समजूत घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला व अखेर ते पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांच्याशी बोलणी करून त्यांना घेऊन खाली आले. मात्र त्याचाही फायदा झाला नाही. कारण जमाव आपल्या मागणीवर ठाम होता. जमावाने मग रस्त्यावरच धरणे धरले व पोलिस अधीक्षक येईपर्यंत धरणे दिले जाईल, अशी घोषणा केली.
मार्केटमध्ये पळापळ
दरम्यानच्या काळात संध्याकाळचे ६ वाजून गेले होते. पोलिस स्थानकासमोरील रस्त्यावरील वाहतूक बंद पडून गर्दी वाढू लागली. तणावाचे वातावरण पाहून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. तिकडे गांधी मार्केट व न्यू मार्केटमध्ये या घटनांचे पडसाद उमटले. गांधी मार्केटात तलवारी व लाठ्या घेऊन कोणीतरी मागून धावत येत असल्याची अफवा पसरली व दुकाने बंद होऊ लागल्याने ग्राहकांची धावपळ उडाली. गांधी मार्केट व्यापारी प्रतिकारास सज्ज होत असल्याचे पाहून ग्राहकांत पळापळ सुरू झाली. त्या गडबडीत धावताना खाली पडून दोघे जखमी होण्याची घटनाही घडली. तेथील व्यापारी व ग्राहक पळत आल्याचे पाहून नव्या मार्केटातील दुकानेही बंद झाली व गेल्या शुक्रवारचीच अवकळा बाजारावर आली.या धावपळीत खाली पडून जखमी झालेल्यांची नावे जेनी वाझ (सांतेमळ राय) व राया माने (दवर्ली) अशी आहेत. त्यांना प्रथमोपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. गांधीमार्केटात पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांवर यावेळी लोकांनी प्रश्र्नांचा मारा केला.
पणजीला गेलेले पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई अखेर साडेसातच्या सुमारास मडगावात दाखल झाले. त्यांच्यासोबत ज्येष्ठ पोलिस अधीक्षक यादव हेही आले होते. त्यांची नंतर शर्मद रायतूरकर, रुपेश महात्मे व इतरांनी भेट घेतली. गेल्या
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटनांमुळे लोक घाबरले असून याप्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी व तपास होण्याची गरज त्यांनी प्रतिपादिली. काल शहराच्या एका भागात सापडलेली शस्त्रे म्हणजे सुरक्षा यंत्रणांसाठी आव्हान असून तो थट्टेवारी नेण्याचा विषय नसल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
यादव यांनी निदर्शकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व निःपक्षप तपास तथा चौकशीसाठी थोडा अवधी देण्याची विनंती केली. ती मान्य करून निदर्शक भारतमातेचा जयजयकार करीत माघारी परतले.

No comments: