करीशेट्टींने राजीनामा द्यावा, अन्यथा अपात्र करा
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) : पणजी महापालिकेतील "पे पार्किंग' घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्यानंतर आता "बाजार गाळे' घोटाळ्याकडे आपला मोर्चा वळवण्याचा निर्णय भाजप समर्थक नगरसेवक गटाने घेतला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी केलेली घोषणा हवेत का विरली, असा खडा सवाल करून या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी या नगरसेवकांनी केला आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवक मिनीन डिक्रुझ यांनी ही माहिती दिली. यावेळी नगरसेवक सुरेश चोपडेकर,रूपेश हळर्णकर,वैदही नाईक,संदीप कुंडईकर,वर्षा हळदणकर,ज्योती मसुरकर व दीक्षा माईणकर आदी उपस्थित होते. लोकांनी विश्वास दाखवून नगरसेवक म्हणून निवडून दिलेल्या नागेश करीशेट्टी याने महापालिकेच्या नावाने बेकायदा "पे पार्किंग' शुल्क आकारून लाखो रुपयांचा घोटाळा केल्याने पणजी महापालिकेची सर्वत्र बदनामी झाली आहे. अशा घोटाळेबहाद्दर नगरसेवकाने तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा पालिका प्रशासनाने या नगरसेवकाला अपात्र ठरवावे अशी जोरदार मागणी भाजप समर्थक नगरसेवक गटाने केली आहे. यासंबंधी पालिका प्रशासन व नगरविकासमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती श्री. डिक्रुझ यांनी दिली. "पे पार्किंग' घोटाळ्याला महापौर टोनी रॉड्रिगीस तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या पार्किंगसंबंधी माहिती हक्क कायद्याखाली माहिती दोन वेळा नाकारण्यात आली. माजी आयुक्त संजीव गडकर यांनी जेव्हा यासंबंधी चौकशीचे आदेश दिले तेव्हाच यासंदर्भात कुठेतरी पाणी मुरत असल्याचे उघड झाले, असे नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी सांगितले. महापौरांनी जाणीवपूर्वक "पे पार्किंग' च्या निविदा लांबवल्या व जेणेकरून तिथे बेकायदा व्यवसाय करण्यास या लोकांना मोकळीक मिळवून दिली अशी टीकाही यावेळी करण्यात आ ली.
गेल्यावेळी बाजारातील गाळे वितरणात मोेठ्या प्रमामात घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. ही चौकशी समिती कुठे गायब झाली असा सवाल करून हे प्रकरण जाणीवपूर्वक लपवले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याप्रकरणाची नव्याने चौकशी होण्याची गरज असून यातही काही नगरसेवकांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महापालिका निष्क्रिय
महापालिकेची प्रत्येक महिन्यात एक बैठक होणे कायद्याने बंधनकारक असताना गेल्या २७ महिन्यांत केवळ १२ बैठका झाल्याची टीका करून महापौर टोनी रॉड्रिगीस यांच्याकडून पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे मिनिन डिक्रुझ यांनी सांगितले. महापालिकेच्या इतर समित्यांच्या बैठका तसेच पालिका मंडळाच्या बैठकांचे इतिवृत्त तीन ते चार महिन्यांनी नगरसेवकांना पुरवले जाते. यावरून महापालिकेत कसा कारभार हाकला जात आहे, याचा प्रत्यय येतो,असेही ते म्हणाले. लोकांच्या विविध समस्या तथा अडचणींबाबत विचार मांडण्याची संधीच मिळत नसल्याने ही महापालिका पूर्णपणे निष्क्रिय बनत चालल्याचा आरोप डिक्रुझ यांनी केला.
Tuesday, 1 July 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment