Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 3 July 2008

"मुस्लिमांचे चोचले पुरवणे पुरे झाले'

श्रीपाद नाईक कॉंग्रेसवर कडाडले

अमरनाथ प्रकरणी पणजीत "धरणे'
पणजी, दि. 3 (प्रतिनिधी) - केवळ मतांवर नजर ठेवून कट्टरतावादी मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यास कॉंग्रेसने सुरुवात केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ देवस्थान मंडळाला यात्रेकरूंच्या सोयीसुविधांसाठी दिलेली जागा मुस्लिमांच्या हट्टापायी परत घेण्याचे दुष्कृत्य हे उघडपणे जातीयवादाचे समर्थन असून कॉंग्रेस पक्ष आगाशी खेळ करत असल्याची घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केली.
अमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेली जमीन परत घेण्याच्या जम्मू-काश्मीर सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज भाजपतर्फे देशव्यापी "बंद'चे आवाहन करण्यात आले होते. गोवा प्रदेश भाजपतर्फे गोमंतकीय जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी "बंद'ची हाक न देता पणजी जेटी येथे निषेध धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी नाईक बोलत होते.
देशात जात व धर्माच्या नावावर लोकांना विघटन करण्याचे काम कॉंग्रेस करीत असून प्रत्येक धर्माला वेगळी वागणूक देत असल्याचा आरोप नाईक यांनी केला. धर्माच्या हक्काबाबत बोलल्यास त्याला धार्मिकतेचा रंग चढवून स्वतः मात्र मुस्लिमांचे चोचले पुरवून सर्व धर्मसमभावाचा आव आणला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
ते म्हणाले, खुद्द राज्यपाल अध्यक्ष असलेल्या अमरनाथ देवस्थान मंडळाला अमरनाथ यात्रेकरूंच्या सोयीसाठी व्यवस्था उभारण्यासाठी दिलेली जागा येथील काही कट्टरपंथीय मुस्लिमांच्या दबावाला बळी पडून मागे घेण्यात येते याचा अर्थ काय? देशाच्या सार्वभौमत्वापेक्षा कॉंग्रेसला आपली सत्ता प्रिय असल्यानेच हे स्वार्थी राजकारण केले जात आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यावर चौफेर टीका केली. खुद्द भारतात राहून पाकिस्तानचे समर्थन करणे व काश्मिरी राष्ट्रीयत्वाची भाषा बोलणे हा राष्ट्रद्रोह आहे व तो अजिबात खपवून घेतला जाऊ नये. कॉंग्रेसकडून या कृत्याला खतपाणी घालण्याचे पाप केले जात आहे.
भाजप महिला मोर्चा,युवा मोर्चा,अल्पसंख्याक मोर्चा व विविध मतदारसंघाच्या मंडळ समितीचे अनेक कार्यकर्ते याठिकाणी या निषेध धरणे कार्यक्रमात सहभागी झाले होते. श्रीपाद नाईक यांच्यासह आमदार दयानंद सोपटे,राजेश पाटणेकर,मिलिंद नाईक,महादेव नाईक,माजी आमदार प्रकाश वेळीप,विनय तेंडुलकर,सदानंद शेट तानावडे,राजेंद्र आर्लेकर, सरचिटणीस गोविंद पर्वतकर,संजय हरमलकर,महिला मोर्चाच्या अध्यक्ष मुक्ता नाईक,उपाध्यक्ष वैदही नाईक,प्रदेश भाजप उपाध्यक्ष कुंदा चोडणकर, युवा मोर्चाचे सरचिटणीस रूपेश महात्मे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इब्राहिम मुसा, विठू मोरजकर, पणजीचे माजी महापौर अशोक नाईक, पणजीच्या नगरसेविका ज्योती मसुरकर, दीक्षा माईणकर, नगरसेवक रूपेश हळर्णकर आदी अनेकजण याप्रसंगी उपस्थित होते. यापैकी अनेकांनी अनेकांनी आपल्या भाषणात केंद्र व जम्मू-काश्मीर सरकारवर टीका केली. जोपर्यंत कलम 370 रद्द केले जात नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहणार असेही त्यांनी सांगितले. यावेळी गुलाम नबी आझाद यांचा पुतळा जाळण्यात आला.
दुपारी 3.30 ते सायंकाळी 6 दरम्यान हा धरणे कार्यक्रम झाला तेव्हा तेथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

No comments: