Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 1 July 2008

क्रितेश गावकर मुरगावचे नगराध्यक्ष सुचेता शिरोडकर उपनगराध्यक्ष

वास्को, दि. १ (प्रतिनिधी) : मुरगावच्या नगराध्यक्षपदी क्रितेश गावकर यांची, तर उपनगराध्यक्षपदी सुचेता शिरोडकर यांची निवड झाली आहे. आज पालिका कार्यालयात झालेल्या निवडणुकीत गावकर व शिरोडकर यांनी ११ विरुद्ध ८ मते मिळवून शानदार विजय संपादला.
आधीचे नगराध्यक्ष कार्लुस आल्मेदा व उपनगराध्यक्ष सौ. शांती मांद्रेकर यांच्याविरुद्ध २३ जून रोजी अविश्वास ठराव संमत झाला होता. यामुळे ही दोन्ही पदे रिक्त होती. आज सकाळी मुरगाव पालिका सभागृहात निर्वाचन अधिकारी प्रसन्न आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली.
काल या पदांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी १६ अर्ज सादर झाले होते. यात नगरसेवक सैफुल्ला खान, शेखर खडपकर, सौ. अनिता चोपडेकर व क्रितेश गावकर यांनी नगराध्यक्षपदासाठी, तर राजेश घोणसेकर, लविना डिसोझा, सुचेता शिरोडकर व सॅबी डिसोझा यांनी उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी काही वेळ देण्यात आला. यावेळी सैफुल्ला खान, अनिता चोपडेकर (नगराध्यक्ष), लविना डिसोझा व सॅबी डिसोझा (उपनगराध्यक्ष) यांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत क्रितेश गावकर यांनी शेखर खडपकर यांचा ११ विरुद्ध ८ मतांनी पराभव केला. तसेच उपनगराध्यक्षपदासाठी सुचेता शिरोडकर यांनी ११ विरुद्ध ८ मतांनी राजेश घोणसेकर यांचा पराभव केला. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. निवडणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर व वास्को पोलिस निरीक्षक हरिष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

No comments: