Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 30 June 2008

गोव्यामधील कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारावर 'शिक्कामोर्तब'

भाजप नेते गोविंद पर्वतकर यांची टीका
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) : गोव्यातील कॉंग्रेस सरकारच्या राजवटीत झालेल्या भ्रष्टाचाराला आता राष्ट्रीय पातळीवरही "अधिकृत' मान्यता प्राप्त झाली आहे. "इंटरनॅशनल इंडियाज सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज" या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात गोवा राज्य भ्रष्टाचारात आघाडीवर असल्याचे सिद्ध झाल्याने आजपर्यंत भाजपकडून कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे जे आरोप केले जात होते त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर यांनी केली.
आज पणजी येथील भाजप मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना प्रा. पर्वतकर यांनी विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजप सरकारच्या राजवटीत प्रगती व विकासाच्या बाबतीत प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या गोव्याला भ्रष्टाचारी राज्यांच्या पंक्तीत बसवून कॉंग्रेसने गोव्याची प्रतिमा धुळीस मिळवल्याचा आरोप प्रा. पर्वतकर यांनी केला. भ्रष्टाचाराच्यासंबंधीचा हा अहवाल खुद्द देशाचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आल्याने गोव्यासाठी ही अत्यंत शरमेची गोष्ट ठरल्याचे ते म्हणाले.
गोव्यात प्रादेशिक आराखडा २०११ च्या निमित्ताने करण्यात आलेले भूखंड विक्री व्यवहार, "सेझ'च्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिकांशी संधान बांधून "चांदी' करण्याचे प्रकार तसेच राज्यात विविध ठिकाणी बेकायदा खाण उद्योगाला दिलेली परवानगी ही त्यामागील मुख्य कारणे असल्याचे प्रा. पर्वतकर म्हणाले. गोवा वाचवण्याची अजूनही संधी असून केवळ व्यासपीठावरून सभा, बैठकांत भाषणबाजी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष राज्यकारभार सुधारण्याची गरज आहे. प्रशासनांत सुरू असलेला भ्रष्टाचार तात्काळ रोखण्याची नितांत गरज असल्याचेही त्यांनी जोर देऊन सांगितले.
पोलिसांची कृती संशयास्पद
मडगाव येथे मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी उद्भवलेल्या प्रकरणाला समाजातील दोन जातीय घटकांमधील वादाचे स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे प्रा. पर्वतकर म्हणाले. पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडून लोकांवर केलेल्या लाठीमारामुळेच हे प्रकरण चिघळले असा आरोप पर्वतकरांनी केला. भाजप कार्यकर्ते समजून पिंपळकट्टा येथे एका सभेवर जो लाठीहल्ला करण्यात आला त्यात निरपराधी लोक जखमी झाले. भाजपच्या मडगाव मंडळाचे सरचिटणीस देविदास बोरकर यांना खोट्या आरोपांखाली पोलिस स्थानकांत बोलावून कोठडीत डांबल्याने भाजपला या वादात पडावे लागले. वास्तविक या प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण पर्वतकर यांनी दिले. मडगाव गट कॉंग्रेसचे अध्यक्ष दयानंद देऊलकर यांनी या दंगलप्रकरणी भाजपवर केलेल्या आरोपांमागील बोलवता धनी वेगळाच असल्याचे सांगून मडगाववासीयांना ते चांगलेच अवगत असल्याचा टोमणा प्रा. पर्वतकर यांनी हाणला.

No comments: