Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 29 June 2008

तीन कामगारांचा झोपेतच गूढ मृत्यू

धुरामुळे गुदमरल्याचा संशय
पणजी, दि. 29 (प्रतिनिधी) - करंजोळ दुधसागर येथे रेल्वे स्थानकाच्या एका खोलीत झोपी गेलेल्या तिघा कामगारांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. दि. 27 जून रोजी रात्री कामावरून येऊन अशोक बोली बारीक (32), मनोज नरसिंमा कांडी (21) व सर्वेश्वर दोबी नाईक (35) सर्व पुरी ओरिसा येथे राहणारे असून हे कामगार रेल्वे स्थानकाच्या मागे असलेल्या वसाहतीतील एका खोलीत झोपले होते. काल सकाळी अन्य कामगार त्यांना उठवण्यासाठी आले असता, हा प्रकार उघडकीस आला. वास्को रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव येथील हॉस्पिसीयो इस्पितळात पाठवले आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही.
प्राप्त माहितीनुसार रेल्वेचे नवे रूळ बसवण्याचे आणि साफ करण्याचे काम सुरू असून त्यासाठी एका कंत्राटदाराने ओरिसा येथून हे कामगार आणले आहेत. दि. 27 जून रोजी सायंकाळी कामावरून खोलीवर परतल्यावर जेवण करून हे कामगार झोपी गेले होते. या परिसरात डासांचा भरपूर असल्याने त्यांनी येथेच असलेल्या कोळशांना आग लावून धूर केला होता. त्याचप्रमाणे डास आत येऊ नये, यासाठी दारं आणि खिडक्याही गच्च लावून घेतल्या होते. यावेळी कोळशाचा झालेल्या धुरात घुसमटून त्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत्यूचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवचिकित्सेनंतरच या प्रकरणावर उजेड पडणार असल्याचे वास्को रेल्वे पोलिसांनी सांगितले. याविषयीचा अधिक तपास वास्को रेल्वे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक आनंदू देसाई करीत आहे.

No comments: