Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 2 July 2008

रस्ते वाहतूक विभागात भ्रष्टाचार; दक्षता खात्याकडून गंभीर दखल

महेश नायक यांच्याकडून सचिवांना पुरावे सादर
पणजी, दि. २ (प्रतिनिधी) : मडगाव येथील "जय दामोदर' संघटनेचे अध्यक्ष महेश नायक यांनी राज्यातील रस्ता वाहतूक खात्यात प्रामुख्याने दक्षिण गोव्यातील कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचारासंबंधीची पुराव्यासह माहिती दक्षता खात्याचे सचिव व्ही. के. झा यांच्याकडे सुपूर्द केल्याने रस्ता वाहतूक खात्यातील अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
विधानसभा अस्थायी समितीच्या दक्षता खात्याची सुनावणी सुरू असताना महेश नायक यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी समितीसमोर ठेवलेल्या अनेक प्रकरणांत प्रथमदर्शनी तथ्य दिसत होते. त्यामुळे दक्षता खात्याचे सचिव व्ही. के. झा यांनी नायक यांना ही सर्व कागदपत्रे घेऊन भेटण्याची विनंती केली होती. त्यानुसार नायक यांनी सादर केलेल्या या कागदपत्रांवरून दक्षता खात्याने तात्काळ चौकशी करून पंधरा दिवसांत चौकशी अहवाल सादर करा, असा आदेश श्री. झा यांनी खात्याचे संचालक अमरसिंग राणे यांना दिल्याची माहितीही नायक यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे जेणेकरून चौकशीत कोणतेही अडथळे निर्माण होणार नाहीत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या अधिकाऱ्यांना पदांवर ठेवून जर चौकशी केली तर पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता नायक यांनी व्यक्त केली.
मुळातच रस्ता वाहतूक अधिकारीपदासाठी लाखोंची लाच देऊन नोकरी दिली हे उघड गुपित आहे. हा पैसा वसूल करण्यासाठीच अशा प्रकारे अनेक गैरव्यवहार या खात्यात उघडपणे केले जातात. या गैरव्यवहारांना वरिष्ठांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांचा वरदहस्त लाभत असल्यानेच या भानगडी उघड होत नाहीत,असा आरोपही नायक यांनी केला आहे. भ्रष्टाचार व गैरव्यवहार उघड करणे ही दक्षता खात्याची जबाबदारी असेल तर त्यांनी हा घोटाळा उघड करून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी असे जाहीर आव्हानही नायक यांनी दिले.
दक्षता खात्याला याप्रकरणी सर्व कागदोपत्री पुरावे सादर करूनही चौकशी केली जात नसल्याची तक्रार नायक यांनी अस्थायी समितीसमोर ठेवल्याने त्यावेळी दक्षता सचिव श्री. झा यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे मान्य केले होते. तत्कालीन वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी ५ मार्च २००७ रोजी महेश नायक यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली व त्यासंबंधी दक्षता खात्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्य सचिव जे. पी. सिंग यांना जारी केले होते. यासंबंधी चौकशी अहवाल २० मार्च २००७ रोजी सादर करण्याचा आदेशही देण्यात आला होता. तथापि, त्यानंतर पुढे काहीही झाले नाही. त्यामुळे या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर, दक्षता सचिव हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळतात हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. नायक यांनी सादर केलेल्या तक्रारींत पुराव्यासह एकूण १७ गंभीर आरोप विविध रस्ता वाहतूक अधिकाऱ्यांवर केले आहेत. वाहन चालक परवाने,फिटनेस परवाने, प्रदूषण नियंत्रण परवाने, परवाने नूतनीकरण, वाहन बदली, बनावट परवाने आदी प्रकरणांसह मोटर वाहन कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रस्ता वाहतूक खात्यात विविध कामांसाठी अधिकारी किती दर आकारतात याची एक यादीच तयार करून तीदेखील सचिवांना सादर करण्यात आली आहे. विविध रस्ता वाहतूक खात्यातील अधिकाऱ्यांच्या खाजगी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. नायक यांनी सादर केलेल्या या तक्रारींत विविध अधिकाऱ्यांची नावे असून त्यात वाहतूक खात्याचे उपसंचालक अशोक भोसले,उपसंचालक मान्युएल अफोन्सो,साहाय्यक संचालक दिलीप नागवेकर, रस्ता वाहतूक अधिकारी अभय नाईक आदींचा सहभाग आहे.

No comments: