पणजी, दि. 26 (प्रतिनिधी) - कांदोळी समुद्र किनाऱ्यावर मिळालेला महिलेचा मृतदेह हा मेघनाचाच आहे का, हे स्पष्ट करण्यासाठी मृतदेहाची "डीएनए' चाचणी करण्याची मागणी बेपत्ता मेघना सुभेदार हिचे वडील डॉ. मोहन सुभेदार यांनी आज केली आहे. दोन दिवसापूर्वी कांदोळी समुद्र किनाऱ्यावर नग्न अवस्थेत आणि अत्यंत कुजलेल्या स्थितीत एका तरुणीचा मृतदेह हाती लागल्यानंतर तो मृतदेह मेघनाचा असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर मेघनाचे वडील डॉ. सुभेदार यांनी हा खुनाचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे मुंबई येथून बेपत्ता झालेल्या मेघनाच्या खुनाचा तपास करण्याची जबाबदारी कळंगूट पोलिसांवर येऊन पडली आहे. मेघनाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी बंगळूर, मुंबई व पुणे येथे एक पोलिस पथक आज सकाळी रवाना झाले आहे.
मेघनाचा काही वर्षापूर्वी घटस्फोट झाल्याची माहिती उघड झाली असल्याने पुणे येथे राहत असलेले तिच्या पतीचीही या विषयात चौकशी केली जाणार आहे. बंगळूर येथील एका सॉप्टवेअर कंपनीत कामाला असलेली मेघना एप्रिल महिन्यात छत्तीसगड येथे आपल्या घरी येण्यासाठी निघाली होती. दि. 10 एप्रिल रोजी ती मुंबई येथील सीएसटी रेल्वे स्थानकावर पोचल्यावर तिने घरी दूरध्वनी करून आपण रेल्वेतून घरी येत असल्याचे सांगितले. परंतु ती घरी पोहोचली नसल्याने वडिलांनी तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केली. शेवटी दि. 14 एप्रिल रोजी सीएसटी रेल्वे पोलिस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची पोलिस तक्रार दाखल केली. या दरम्यान मेघनाच्या बॅंक खात्यातून पाच हजार रुपये काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे पैसे मडगाव येथील एका "एटीएम'मधून काढल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी याठिकाणी येऊन एटीएममध्ये बसवण्यात आलेल्या "सीसी'टीव्ही वरील क्लिप्सची पाहणी केली. त्या क्लिप्सवरून हे पैसे मेघनानेच काढल्याचे उघड झाले. त्यानंतर मेघना वापरत असलेला मोबाईल कळंगूट येथील एका कामगाराकडे सापडला होता.
बेंगलोर येथून घरी जाण्यासाठी आलेली मेघना मुंबईत पोहोचल्यावर गोव्यात कशी पोहोचली, हा प्रश्न तिच्या कुटूंबीयांना सतावत आहे. पेशाने डॉक्टर असलेले सुभेदार यांचे छत्तीसगड येथे स्वतःचे इस्पितळ आहे. परंतु ते मुलीला न्याय देण्यासाठी आपली पत्नी व एका मुलीसह गोव्यात तळ ठोकून आहेत. गोव्यात तिचे कोणी ओळखीचे होते का, गोव्यात ती कोणासोबत राहत होती, या सर्व घटनेचा शोध घेतला जात आहे. मेघनाच्या खुनाचा तपास लावणे हे पोलिसांसाठी एक आव्हान आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात करण्यात आलेल्या शवचिकित्सा अहवालात मृत्यूचे नेमके कारण देण्यात आले नाही. परंतु तिचा "व्हिसेरा' हैद्राबाद येथील पोलिस प्रयोग शाळेत पाठवून देण्यात आला आहे. त्यावरून तिचा अमली पदार्थांशी संपर्क आला होता का, हे स्पष्ट होणार आहे.
Sunday, 29 June 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment