विष्णू वाघ यांच्याकडून खरडपट्टी
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) : मडगाव दंगल प्रकरणी कॉंग्रेस प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी केलेली हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी हास्यास्पद आहे. त्यामुळे कॉंग्रेस हिंदू जनतेची सहानुभूती गमावून बसेल. देशप्रभूंना उपदेश करायचाच असेल तर मडगावात स्थायिक झालेल्या बाहेरगावच्या मुसलमानांना करावा किंवा त्यांचा फारच पुळका असेल तर तमाम गोव्यातील मुसलमानांना पेडण्यातील आपल्या राजवाड्यात स्थलांतरीत करावे, अशा शब्दांत प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विष्णू वाघ यांनी देशप्रभू यांची खरडपट्टी काढली आहे. तथापि, यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातील मते आपली वैयक्तिक असल्याचे श्री. वाघ यांनी म्हटले आहे.
बाहेरगावच्या मुसलमानांनी पद्धतशीरपणे प्रमुख शहरांतील बाजारपेठा बळकावल्या आहेत. वरून ते गोंयकारांनाच शिरजोरी दाखवू लागले आहेत. त्यांना येथे राहायचेच असेल तर गोंयकारांशी नम्रपणे वागावे. त्यांची दादागिरी वाढत गेल्यामुळे हिंदूंच्या मनात आकस निर्माण झाला आहे, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही.
मडगावप्रमाणेच फोंड्यातही मुस्लिमांची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. फोंड्यात अनेक ठिकाणी त्यांचे मदरसे आहेत. या मदरशांत कट्टरपंथी शिक्षण दिले जाते. सरकारने आवश्यकता असेल तेथे उर्दू शाळांची सोय केली आहे. असे असताना हे मदरसे कशाला? फोंडा शहरात सध्या पाच मोठ्या मशिदींचे विस्तारीकरण सुरू आहे. या बांधकामासाठी पैसा कुठून व कुणाकडून येतो याची चौकशी झाली पाहिजे.
गोव्यातील पारंपारिक मुस्लिम समाज हिंदू व ख्रिश्चनांशी मिळून मिसळून वागतो. मात्र बाहेरील मुस्लिम लगेच आपला जमाव करतात. गोव्यात कधीही बुरखा पद्धत प्रचलीत नव्हती. बाहेरच्या मुस्लिमांनी ती येथे आणली. गोल टोपी घालणारा व दाढी ठेवणारा मुसलमान पूर्वी क्वचित दिसायचा, आज त्यासाठी सक्ती केली जात आहे. मुसलमानांच्या या हट्टाग्रहामुळेच जातीय तेढ वाढते आहे. त्यामुळे आपणही संघटित व्हावे असे हिंदू समाजाला वाटू लागले आहे. हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुसलमानांवर केंद्र सरकार कोट्यावधी रुपये खर्च करते पण अमरनाथ यात्रेकरूंसाठी निवासधाम बांधायला काश्मीरमधील सत्ताधारीच विरोध करतात तेव्हा हे सरकार गुपचूप पायात शेपटी घालते. हा दुजाभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत हिंदूच्या मनात असुरक्षितता राहणारच. घटनेतील समानता खऱ्या अर्थाने राबवायची असेल तर धर्माच्या आधारे मुस्लिमांना मिळणाऱ्या अरितिक्त सवलती रद्द केल्या पाहिजेत.
देशप्रभूंना मुस्लिमांचा फारच पुळका आला असेल तर त्यांनी मडगाव, फोंडा, वास्को येथे घुसलेल्या बाहेरच्या मुसलमानांना पेडण्यात न्यावे व व्हायकाऊंटच्या आवारात त्यांना आसरा द्यावा. नाहीतरी देशप्रभूंकडे गोव्यातील सर्व मुसलमानांना सामावून घेण्याएवढी जमीन आहेच. ती त्यांनी कब्रस्तान, मशिदी व मदरसे बांधण्यासाठी दान करावी. म्हणजे तमाम अल्पसंख्य त्यांना दुवा देतील.
कॉंग्रेस हा सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष आहे. म्हणून आम्ही त्या पक्षात आहोत. तथापि, सेक्युलरीझमचा अर्थ उठसूठ हिंदूंना लाथा घालणे असा होतो काय? मडगावचे निमित्त करून विहिंप, बजरंग दलावर बंदी घालण्याची मागणी म्हणजे साप सोडून काठी बडवण्यासारखे आहे. बंदी घालण्याएवढ्या या संघटना मोठ्या आहेत का? मडगावी एवढे मोठे प्रकरण घडले तर "दुर्जनांचा नाश' करण्याची भाषा बोलणारी सनातन संस्था कुठे गेली? गडकरी रंगायन उद्ध्वस्त करू पाहणारे हिंदू जनजागृतीवाले थंडगार का पडले? या असल्या डरपोक संघटनांमुळेच हिंदू समाजाचा आत्मविश्वास डळमळीत होतो. तशात देशप्रभूंसारख्या प्रवक्त्याची भर पडली की मुजोर अल्पसंख्यांकांच्या अंगावर मूठभर मांस चढते.
रुढ अर्थाने मी हिंदुत्ववादी नाही. पण हिंदू जीवनपध्दतीचा आणि तत्वज्ञानाचा उपासक आहे. या भूमीतून जे विचार निपजले ते अन्य ठिकाणी स्थापित झालेल्या इतर धर्मातील विचारांपेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहेत अशी माझी धारणा आहे. इतरांचे लांगूलचालन करण्यासाठी हिंदुंवर दुगाण्या झाडण्याचे काम कणाहीन माणसेच करू शकतात. आम्ही कॉंग्रेसमध्ये आहोत, पण कणा वाकवणे आम्हाला मान्य नाही. अमरनाथ यात्री निवास प्रकरणी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाज यांनी जे घाणेरडे राजकारण केले ते कॉंग्रेसमधील हिंदूंना मान खाली घालायला लावणारे आहे. या पार्श्वभूमीवर रावराजे देशप्रभू गोव्याचे "गुलाम नबी' होऊ पाहात असीतल तर आमचा नाईलाज आहे, असे विष्णू वाघ यांनी म्हटले आहे.
Tuesday, 1 July 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment