Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 30 June 2008

मुख्य संशयिताला अटक दवर्ली छेडछाड प्रकरण

मडगाव ,दि. ३० (प्रतिनिधी): गेल्या शुक्रवारी दवर्ली व मडगावात ज्या कारणावरून दंगल उसळली त्या छेडछाड प्रकरणातील मुख्य संशयित जलील शेख व आणखी दोघांना आज अटक करण्यात आली; तथापि त्यांच्यावर मंतेश रागी यांचे घर व दुकान फोडल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. मकबुल शेख व इम्तियाज अली अशी त्यांची नावे आहेत.
या पूर्वी पोलिसांनी शुक्रवारी रात्री याच आरेापाखाली ५ जणांना, तर काल दोघांना अटक केली होती. त्यामुळे आतापर्यंत याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या २२ झाली आहे. काल अटक केलेल्या समीर व अहमद गौर यांची कडक निर्बंध घालून सुटका करण्यात आली होती. "बंद'साठी सक्ती करणे व चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप ठेवून अटक केलेल्या अन्य १२ जणांनाही काल सशर्त मुक्त करण्यात आले होते.
उपलब्ध माहितीनुसार सलील याने संबंधित युवतीची छेड बसमध्ये चढून काढली होती व त्याबद्दल मंतेश याने पंच निस्सार याच्या समक्ष त्याला जाब विचारून दमही भरला होता. नंतर मंतेश व निस्सार यांच्या वाहनांची टक्कर झाली. त्यातून बाचाबाची व विशिष्ट जमावाने येऊन मंतेश याचे घर व दुकान याची मोडतोड करण्याचा प्रकार घडला होता. एका राजकीय पक्षाच्या नेत्याने तर छेडछाड मुस्लिम युवकाने नव्हे तर दामोदर याने काढली होती, असे साळसूद निवेदनही केले होते. तथापि, आजच्या या अटकेमुळे खरे चित्र स्पष्ट होईल, असे चित्र दिसत आहे.
दरम्यान काल १४४ कलम मागे घेतल्यानंतरही शहर परिसरातील वातावरण शांत आहे. अनुचित घटना घडली नसली तरी महत्त्वाच्या ठिकाणचा बंदोबस्त आणखी काही दिवस तसाच राहिल असे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस खात्याकडे गेल्या चार महिन्यांपूर्वीच अशा स्वरूपाची घटना घडण्याची शक्यता वर्तविणारा अहवाल आला होता; तथापि तो कोणीही गांभीर्याने घेतला नव्हता.

No comments: