Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 4 July 2011

पैशासाठी ‘ते’ पोर्तुगिजांनासुद्धा पुन्हा गोव्यात आणतील : विजय

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
माध्यम विषय हा केवळ मातृभाषेचा प्रश्‍न नसून ते भारतीय भाषांचे ‘इन्क्विझिशन’ आहे. धर्मांतराला विरोध करणार्‍यांवर पोर्तुगिजांनी ज्या पद्धतीने ‘इन्क्विझिशन’ केले तसाच प्रकार सध्या कोकणी आणि मराठी भाषेच्या बाबतीत गोव्यात सुरू आहे. स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी काही स्वार्थी नेते पुढे सरसावले आहेत. त्यांच्या पुढे पैसे फेकले तर पोर्तुगिजांना पुन्हा गोव्यात आणायलाही ते मागेपुढे पाहणार नाहीत, असे परखड मत भाजपचे राज्यसभा खासदार तथा राष्ट्रीय प्रवक्ते तरुण विजय यांनी व्यक्त केले.
प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात श्री. विजय बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह, ट्रस्टचे सदस्य तथा न्यासाचे गोवा संयोजक प्रा. वल्लभ केळकर उपस्थित होते.
प्रत्येक व्यक्तीची मते भिन्न असू शकतात. मतभिन्नतेचा द्वेष करणार्‍या लोकांकडूनच मातृभाषेला विरोध होत आहे. कोणत्याही भाषेला, समाजाला किंवा मतांना आमचा विरोध नाही. प्रत्येकाने सर्व भाषा शिकल्या पाहिजेत. परंतु आईचे दूध पिणार्‍या शिशूला जंगलात फेकून देणे कितपत योग्य, असा सवाल करून लहान मुलांवर इंग्रजी कोणी लादू नये असे मत श्री. विजय यांनी व्यक्त केले.
भारतीय लोकांची स्मृती पुसट होत चालली आहे. पोर्तुगिजांनी गोमंतकीयांवर केलेले अत्याचार, छळ येथील लोकांनी विसरता कामा नये. माध्यमप्रश्‍नी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ‘चापलूस’च्या बाजूने रहावे की भगतसिंगची प्रेरणा घेऊन जगणार्‍या लोकांच्या बाजूने रहावे हे त्यांचे त्यांनीच ठरवावे. भेलपुरी खाण्याएवढा सोपा हा विषय नाही. हा प्रश्‍न आमच्या रक्ताचा, चारित्र्याचा आहे. मातृभाषा नको होती तर मग गोव्यातून पोर्तुगिजांना का हाकलून लावले, या देशातून इंग्रजांना का तडीपार केले. नको ते निर्णय घेऊन स्वतःच्या नजरेतून खाली पडू नका. पुढे कदाचित महासत्ता हातात आली तरी तुमची नजर खालीच राहील असेही श्री. विजय म्हणाले.
जगातील कोणताही देश विदेशी भाषेवर मोठा झालेला नाही. कोणतीही भाषा ही आपल्याबरोबर तेथील संस्कृती, शब्दप्रयोग, म्हणी तसेच तेथील इतिहास आणि भूगोलही घेऊन येते. त्यामुळे या गुलामगिरीच्या मानसिकतेला विरोध झालाच पाहिजे असेही तरुण विजय यांनी शेवटी सांगितले.

No comments: