Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 9 July 2011

मुंबई पोलिसांनी गोव्यातून ‘शार्पशूटर’ला उचलले

स्थानिक पोलिस अनभिज्ञ
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): गोवा पोलिसांना कोणताही थांगपत्ता न लागू देता आज मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाने गोव्यात कारवाई करून दाऊद इब्राहिमच्या भावावर गोळीबार करणारा उमर उल रेहमान या ‘शार्पशूटर’ला हरमल येथून ताब्यात घेतले.
या कारवाईबाबत कोणताही सुगावा मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांना लागू दिला नाही. मात्र, मुंबई पोलिसांना संपर्क साधला असता दोघांना गोव्यातून ताब्यात घेतल्याचे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे संशयित हरमल येथे राहत होते. यावेळी त्यांच्याकडून अकरा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
यापूर्वी या प्रकरणी सय्यद अली (२९) आणि इंद्रा खत्री (२७) यांना अटक करण्यात आली होती. सर्वजण छोटा राजन टोळीतील शार्पशूटर असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. त्यांनी केलेल्या गोळीबारात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याचा सुरक्षारक्षक तथा वाहन चालक अरिफ सय्यद अबू बुखा ठार झाला होता.
अधिक माहितीनुसार दि. १७ मे रोजी पाकमोडीया रस्ता दक्षिण मुंबई येथे कासकर याच्या बंगल्याबाहेर दोघा अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यात इक्बाल कासकर बचावला मात्र, त्याचा सुरक्षारक्षक ठार झाला होता. बुखा या त्याच्या चालकाला सहा गोळ्या लागल्या होत्या.

No comments: