Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 8 July 2011

दयानिधी मारन यांचा अखेर राजीनामा

द्रमुकला तिसरा जोरदार झटका
-कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
-तिहारमध्येच होणार रवानगी

नवी दिल्ली, दि. ७ : कोट्यवधी रुपयांच्या २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने आज संपुआ सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा बळी घेतला. ए. राजा यांच्यानंतर आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारन यांनीही राजीनामा दिला. या घोटाळ्याने आतापर्यंत द्रमुकच्या दोन मंत्र्यांचा बळी घेतला आहे. दरम्यान, मारन यांना सीबीआयकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असून, अटक झाल्यानंतर त्यांनाही तिहार कारागृहातच पाठविण्यात येणार आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मारन सहभागी झाले. काही वेळ बैठकीत थांबल्यानंतर मारन यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांच्या स्वाधीन केला. मारन यांनी राजीनामा द्यावा, असा आदेश द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी आज सकाळीच दिले होते.
संपुआ सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत मारन हे दूरसंचार मंत्री असताना त्यांनी २००६ मध्ये चेन्नईमधील दूरसंचार प्रमोटर सी. शिवशंकरन यांना आपले एअरसेलमधील शेअर्स मलेशियातील आपल्या मर्जीतल्या कंपनीला विकण्यासाठी भाग पाडले होते, असा आरोप सीबीआयने आपल्या चौकशी अहवालात ठेवल्यानंतर मारन यांचा राजीनामा अटळ मानला गेला होता.
यानंतर पंतप्रधानांनी आज सकाळी द्रमुक सांसदीय पक्षाचे प्रमुख टी. आर. बालू यांना भेटीस बोलावले आणि मारन आता मंत्रिमंडळात कायम राहू शकत नाही, असा निरोप द्रमुक नेतृत्वास कळविण्यास सांगितले. बालू यांनी पंतप्रधानांचा निरोप करुणानिधी यांना कळविला. त्यानंतर लगेच करुणानिधी यांनी मारन यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले.
दरम्यान, स्पेक्ट्रम घोटाळ्यात आज आपला बळी जाणार असल्याचे माहीत असतानाही मारन यांनी चेहर्‍यावर कुठलेही भाव न आणता मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले. एङ्ग. एम. वाहिन्यांच्या परवान्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर काही वेळासाठी ते बैठकीतून बाहेर आले. यानंतर ते आपल्या निवासस्थानी गेले आणि राजीनामापत्र घेऊनच पंतप्रधानांच्या निवासस्थानी आले. विशेष म्हणजे, मुरासोली मारन यांचे पुत्र असलेले मारन हे करुणानिधी यांचे नातू आहेत. मुरासोली मारन हे करुणानिधी यांचे भाचे आहेत.
द्रमुकला तिसरा धक्का
२-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी मंत्रिमंडळातून राजीनामा देणारे मारन हे दुसरे मंत्री ठरले आहेत. यापूर्वी, ए. राजा यांनी दूरसंचार मंत्री म्हणून राजीनामा दिला होता. राजा यांच्यानंतर करुणानिधी यांची कन्या खासदार कानिमोझी यांनाही याच प्रकरणात अटक झाली असून, त्या सध्या राजा यांच्यासोबतच तिहार कारागृहात आहेत.
विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची मारन यांची ही दुसरी वेळ आहे. २००७ मध्ये त्यांचे करुणानिधी यांच्या परिवाराशी मतभेद उङ्गाळून आल्यानंतर द्रमुक नेतृत्वाने त्यांचा राजीनामा मागितला होता. त्यानंतर मे २००९ मधील निवडणुकीनंतर त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तथापि, त्यांच्याकडे कमी महत्त्वाचे समजले जाणारे वस्त्रोद्योग खाते देण्यात आले होते.

No comments: