राष्ट्रवादीच्या भारती चव्हाणांचा जबर टोला
पणजी, दि. ४ ( प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेस व मगो पक्षाच्या पाठिंब्यावर सध्या राज्यातील आघाडी सरकार सत्तेवर आहे. गोव्यात कुणाही एका राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळणे शक्यच नाही व त्यामुळे स्वबळावर सरकार स्थापन करण्याची भाषा कॉंग्रेसला अजिबात शोभत नाही, असा जबर टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय निरीक्षक भारती चव्हाण यांनी लगावला आहे.
आज इथे एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कॉंग्रेसला उद्देशून हा चिमटा काढला. राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. जनतेला स्थिर सरकार लाभावे या उद्देशानेच ही आघाडी स्थापन झाली. आघाडीअंतर्गत विचारविनिमय करण्यासाठी, तसेच प्रत्येक निर्णयावर सर्व पक्षांना आपले मत मांडण्याचा अधिकार प्राप्त व्हावा या उद्देशाने समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. मात्र या समितीची बैठक गेली तीन वर्षे बोलावण्यात आलेली नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस हा या आघाडी सरकारचा महत्त्वाचा घटक असल्याने या समितीची बैठक बोलावण्याची जबाबदारी त्यांची आहे. राज्यात विविध विषयांवर निर्णय घेताना या समन्वय समितीला विश्वासात घेणे गरजेचे होते. परंतु, कॉंग्रेसकडून मात्र तसे अजिबात केले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष राज्यात आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे व या कामात लोकांकडून भरीव प्रतिसाद मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. कॉंग्रेसकडून आघाडीचा धर्म पाळला जात नसेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत चाळीसही मतदारसंघात उमेदवार उतरवण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने चालवली आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Tuesday, 5 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment