भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा निर्धार
मुलाखत- किशोर नाईक गावकर
(मुख्य प्रतिनिधी, ‘गोवादूत’)
प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना या पक्षाला गोव्यात पहिल्यांदाच सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होण्याचा बहुमान प्राप्त झाला. आज पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदावर एकमताने त्यांची निवड झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने पुन्हा एकदा सत्तेवर आरूढ होण्याचा दुग्धशर्करा योग प्राप्त झाला तर हा आपल्या जीवनातील एक आनंदाचा व समाधानाचा क्षण ठरेल,असे ते म्हणतात. मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा आज वाढदिवस. या शुभदिनाचे औचित्य साधून त्यांच्या नजरेतून राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा ‘गोवादूत’ ने घेतला. या प्रसंगी त्यांनी साधलेला हा दिलखुलास व सडेतोड संवाद.
फोफावलेला बेकायदा खाण व्यवसाय, त्याचे परिणाम म्हणून शेती, बागायती, कुळागरे, जलस्त्रोत व एकूणच पर्यावरण व निसर्गाचा र्हास, बेदरकार खनिज वाहतुकीचे निष्पाप बळी, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले दर, भू माफिया व ड्रग्स माफियांचा उच्छाद, वाढते, खून, दरोडे, चोर्या व धार्मिकस्थळांची तोडफोड, राजकीय व प्रशासनातील प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी नोकर्यांचा जाहीर लिलाव आदी अनंत संकटांनी गोमंतकीय जनता हताश बनलेली आहे. एक प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने कॉंग्रेस राजवटीच्या हिंस्र जबड्यातून गोमंतकीयांना मुक्त करून खर्या अर्थाने गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी भाजप सर्व ताकदीनिशी सज्ज आहे, असा आत्मविश्वासपूर्ण निर्धार भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बोलून दाखवला.
- मनोहर पर्रीकरांचे लोकप्रिय सरकार कपट कारस्थानाने पाडल्यानंतरच्या राजवटीबाबत तुमचे काय मत?
माजी मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारची लोकप्रिय कारकीर्द अजून सात वर्षांनंतरही गोमंतकीयांच्या मनात व हृदयात ताजी आहे. या काळात जनतेसाठीच्या विविध योजना फाईलमध्ये अडकून न राहता प्रत्यक्ष सामान्यांच्या घरोघरी पोहोचल्या. शेतकरी, विधवा, अपंग, रेंदेर, दुग्धव्यावसायिक, वयोवृद्ध आदी घटकांच्या दुःखावर फुंकर मारतानाच कॉंग्रेसने पोखरून टाकलेली राज्याची अर्थव्यवस्था भक्कम बनवण्याचे महान कार्य भाजप सरकारने केले. ५१ महिन्यांत डझनभर पुल, रस्ते व इतर साधनसुविधांची उभारणी, ‘इफ्फी’ आयोजनाच्या निमित्ताने राजधानीवर चढलेला साज, त्यात पाटो पुल, आयनॉक्स, कला अकादमीची सुधारणा, रायबंदर बगल रस्ता, दोनापावल रस्ता अशी विविध विकासकामे विक्रमी काळात पूर्ण करण्यात आली. पर्रीकरांनी फक्त पणजीचा विकास केला असा आरोप करणार्यांनी एवढी वर्षे सत्तरी किंवा सासष्टीचा विकास का नाही केला? पर्रीकरांच्या नावाने खडे फोडणार्यांनी गेल्या ७ वर्षांत गोमंतकीय जनतेच्या नजरेत भरणारे एखादे तरी काम केले आहे काय? पर्रीकरांनी उभारलेल्या साधनसुविधांचीच रंगरंगोटी करून व विद्युतरोषणाई करून ‘इफ्फी’ आयोजनावर कोट्यवधी रुपये उधळले जातात. एवढे काम करूनही भाजपला २१ आमदारांचा जादूई आकडा पार करता आला नाही, याची खंत वाटतेच. परंतु त्यासाठी अनेक कारणे आहेत. गोव्याची भौगोलिक रचना व येथील लोकांची मानसिकता यामुळे कुणाही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळणे तसे कठीणच. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसची राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर झालेली युती व भाजप व म.गो यांनी स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरण्याचा घेतलेला निर्णय ही कारणे सत्तेपासून दुरावण्यास कारणीभूत ठरली.
- कॉंग्रेसला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी भाजपची व्यूहरचना काय असेल?
सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाकडून राज्याची सुरू असलेली प्रचंड हेळसांड व फरफट, आम आदमीच्या नावाखाली सामान्य जनतेची घोर फसवणूक व सामान्य लोकांसमोरील अनंत अडचणी व समस्यांचा डोंगर यामुळे गोमंतकीय जनता कॉंग्रेस पक्षावर जाम भडकली आहे. ‘असंगाशी संग, प्राणाशी गाठ‘ या उक्तीप्रमाणे आघाडीतील बिगरकॉंग्रेस पक्षांनाही कॉंग्रेसच्या पापात धनी व्हायची इच्छा नाही. अशा स्थितीत गोव्याच्या रक्षणासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व बिगर कॉंग्रेसी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे व त्याचे स्पष्ट शुभसंकेत मिळत आहेत. गेल्या सात वर्षांतील वनवासाला गोमंतकीय जनता कंटाळली आहे व त्यामुळे भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी त्यांची धडपड पाहिली तर या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला धोबी पछाड निश्चित आहे.
-माध्यमप्रश्नामागील कॉंग्रेस कोणता डाव आखत आहे?
कॉंग्रेसच्या माथी आत्तापर्यंतचे गुन्हे कमी म्हणून की काय, त्यांनी आता गोव्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात गोव्याची अस्मिता व संस्कृती मुळापासून उखडण्याचाच विडा उचलला आहे. कॉंग्रेस पक्ष सत्तेसाठी कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो, याचे हे ताजे उदाहरण म्हणावे लागेल. भ्रष्टाचार, ड्रग्स माफिया, बेकायदा खाण, महागाई, बेरोजगारी आदी गोष्टींवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच हे नवीन भूत लोकांच्या माथ्यावर नाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेसच्या सत्ताकारणातील हुकमी एक्का म्हणजे अल्पसंख्याकांची एकगठ्ठा मते. हा समाज कॉंग्रेसच्या राजवटीला कंटाळून भाजपकडे झुकत असल्याचे स्पष्ट जाणवल्याने कॉंग्रेसची कलुषित व विघातक बुद्धी जागृत झाली आहे. त्यातूनच गाडून टाकलेले भाषावादाचे भूत पुन्हा एकदा उरकून काढण्याचे पाप कॉंग्रेसने केले आहे. इंग्रजीला अनुदान देण्याच्या नावाखाली प्रामुख्याने ख्रिस्ती बांधवांच्या भावनेला हात घालून आपली राजकीय पोळी भाजण्याची सुनियोजित योजना कॉंग्रेसने आखली आहे. सर्वधर्म समभावाने नांदणार्या गोमंतकात धार्मिक फूट पाडून अल्पसंख्यांकाची एकगठ्ठा मते मिळवून २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा कॉंग्रेसचा मनोदय आहे. प्राथमिक माध्यम धोरणात बदल करून कॉंग्रेसने गेल्या ५० वर्षांत गोव्याची न भरून येणारी सांस्कृतिक व सामाजिक हानी केली आहे व त्यामुळे गोमंतकीय जनता कॉंग्रेसला कधीच माफ करणार नाही. प्रादेशिक आराखडा, सेझ, शेतजमिनींचे बिगरशेतीत रूपांतर व गोवा विक्रीस काढणार्या कॉंग्रेसला या बाबतीत अत्यंत सडेतोडपणे जाब विचारणारा हा ख्रिस्ती अल्पसंख्याक समाज कॉंग्रेसला जवळ करण्याची शक्यताच नाही. त्यामुळे हा डाव कॉंग्रेसवर उलटणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
-सुवर्णमहोत्सवी वर्षातील गोव्याच्या वाटचालीबाबत काय म्हणाल?
गोवा मुक्तीनंतरच्या गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीबाबत मी समाधानी आहे, परंतु गेल्या ७ वर्षांतील राज्याला लाभलेल्या निष्क्रिय सरकारमुळे राज्याची सर्वच क्षेत्रांत पीछेहाट झाली आहे. विदेशी पर्यटकांवरील हल्ले, पोलिस, राजकारणी व ड्रग्स माफियांचे साटेलोटे, गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत ड्रग्स माफियांचे थेट संबंध, संस्थानिकांच्या थाटात वावरणारे अतिमहत्त्वाकांक्षी नेते व अलीकडेच भाषा माध्यमावरून घालण्यात आलेला घोळ यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्षातच गोव्याच्या प्रतिमेला काळा डाग लागला आहे व त्याचे चटके मनाला बोचतात. गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी रचलेला भक्कम पाया व राज्याला सर्वच क्षेत्रांत मिळवून दिलेली दिशा याचा लाभ आजही गोमंतकीयांना मिळत आहे. भाऊसाहेबांनंतरच्या मुख्यमंत्र्यांनीही यात आपले योगदान दिले हे देखील मान्य करावे लागेल. गेल्या सात वर्षांत गोव्याला लागलेली भ्रष्टाचाराची कीड, राजकीय नैतिकतेचे उघड वस्त्रहरण व सत्ता, संपत्तीचा हव्यास यामुळे गोवा बदनाम होत आहे याचे शल्य मनाला बोचते.
-मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाल?
मुख्यमंत्री दिगंबर कामत हे फक्त कागदोपत्री मुख्यमंत्री आहेत. खुर्ची सांभाळणे एवढेच त्यांचे काम. कामत सरकारात मंत्री असलेले विश्वजित राणे व चर्चिल आलेमाव आदी नेते मंत्रिमंडळाला अंधारात ठेवून स्वयंघोषित निर्णय घेतात. एक मंत्री सरकारी इस्पितळे खाजगी कंपनीच्या घशात घालण्यासाठी पुढे सरसावला आहे तर दुसरा सरकारी क्रीडामैदान आपल्या खाजगी संघाच्या नावे करून मोकळा झाला आहे. इथे हर एक मंत्री स्वयंघोषित मुख्यमंत्री असल्यागत वावरताना दिसतो. कामत यांचे मंत्रिमंडळावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही व त्यामुळे कायदा व प्रशासकीय नियम डावलून आपल्या मर्जीनुसार निर्णय घेतले जातात. सरकारवर कोणताच वचक नसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला मंत्रिगणांकडून काहीच महत्त्व दिले जात नाही. यामुळेच राज्याचा कारभार भरकटतोय.
-खाजगी ट्रस्ट व संघटनांच्या नावे चाललेल्या राजकारणाबद्दल आपण काय म्हणाल?
ट्रस्ट किंवा विश्वस्त या समाजाभिमुख किंवा समाजाला उपयुक्त ठरण्याच्या ध्येयाने स्थापन केलेल्या संस्था. निवडणुकीवर डोळा ठेवून स्थापन केलेल्या किंवा याच काळात बंद पडलेल्या व पुनर्जिवित केलेल्या संस्थांचे सध्या पीक आले आहे. जनतेच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांना लाचार बनवण्याचाच घाट या लोकांनी घातला आहे. कुणी रेशनकोटा घरी पोचवतो तर कुणी तरुणांना महिन्याकाठी पाच हजार रुपयांचे ‘अनुदान’ देऊन मद्यालयांच्या बिलांची व्यवस्था करतो. सर्वसामान्य लोकांच्या धार्मिक मनाचा कानोसा घेऊन त्यांना मोफत शिर्डी व वालंकिणी प्रवास घडवून आणण्याचा फंडाही सुरू झाला आहे. समाजाला लाचार बनवून त्यांचा स्वाभिमान हिरावून घेणारे हे लोक स्थानिक संस्थानिकच बनले आहेत. मात्र गोमंतकीय जनता तेवढीच धूर्त व हुशार आहे. या स्वार्थी लोकांचा डाव ती चांगलीच ओळखून आहे. त्यामुळे सरतेशेवटी राजकीय इच्छा बाळगून लोकांना आमिषे दाखवणार्यांचे डोळे पांढरे झाले तर त्याबद्दल आश्चर्य वाटू नये.
- गोव्यातील भ्रष्टाचाराबाबत जनता जागृत आहे काय?
देशात सर्वत्र भ्रष्टाचाराविरोधात जोरदार चळवळ उभी राहिली आहे. अण्णा हजारे, बाबा रामदेव तसेच इतर संघटनांकडून काळा पैसा परत आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव सुरू आहे. या चळवळीचा प्रभाव गोमंतकीयांवर निश्चितच पडला आहे. गोमंतकीयांचा मुळातच शांत स्वभाव असल्याने ते रस्त्यावर जरी उतरत नसले तरी ते निर्बुध्द आहेत असा समज कुणीही करून घेऊ नये. भ्रष्टाचाराबाबत गोमंतकीयांच्या मनात खदखदणारी चीड सर्वसामान्य लोकांत वावरताना दिसून येते. भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशांतूनच जनतेला लाचार बनवण्याचा काही नेत्यांनी घातलेला घाट हीच जनता येत्या काळात उधळून लावणार आहे. गोव्यात स्थिरस्थावर झाल्याचा आव आणून आपली सत्ता कुणीच हिरावून घेऊ शकत नाही या आविर्भावात वावरणार्या कॉंग्रेसचा भ्रमनिरास निश्चित आहे. या पक्षात प्रत्येक नेता वैयक्तिक संस्थानिक बनण्याचा प्रयत्न करीत आहे.त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस पक्ष खिळखिळा बनून या नेत्यांच्या ओझ्याखाली जमीनदोस्त होईल, याबद्दल शंका नसावी.
Monday, 4 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment