Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 3 July 2011

मंत्रिमंडळ बैठकीत माध्यम निर्णयास विरोध करणार : राष्ट्रवादी

देशप्रभू प्रकरणी हस्तक्षेप नाही
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): गोवा सरकारने प्राथमिक शिक्षणाचे इंग्रजीकरण करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे गोव्यातील नागरिकांत संताप पसरला आहे. राष्ट्रवादी पक्षाने यापूर्वीच सरकारला माध्यम प्रश्‍न शिक्षणतज्ज्ञांकडे सोपवावा असे निवेदन दिले आहे. तरीही सरकारने सहकारी पक्षाचे ऐकले नाही तर राष्ट्रवादीचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्‍न उपस्थित करून सरकारच्या निर्णयाला विरोध करतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाच्या गोवा निरीक्षक भारती चव्हाण यांनी केले.
आज पणजी येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भारती चव्हाण बोलत होत्या. या वेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट, ज्येष्ठ उपाध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रवक्ते ऍड. अविनाश भोसले व ट्रॉजन डिमेलो उपस्थित होते.
पत्रकारांनी माध्यम प्रश्‍नावर पक्षाची भूमिका काय, असा प्रश्‍न केला असता त्यांनी वरील निवेदन केले. माध्यम प्रश्‍न शिक्षणतज्ज्ञांनीच सोडवावा या मताशी राष्ट्रवादी ठाम आहे; मुख्यमंत्र्यांना काल दि. १ रोजी भेटून त्याबाबत सूचना करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत पक्षाचे मंत्री सरकारी निर्णयाविरोधात उभे राहतील, असे त्या म्हणाल्या.
यांनी यावेळी केल्या.
महलांसाठी ‘एक्स रे मेमोग्राफी चिकित्सा यंत्र’ सरकारी इस्पितळात उपलब्ध करावे, मलेरिया प्रतिबंधक उपायांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, अनुसूचित जमातींना १२ टक्के आरक्षण मिळावे तसेच समन्वय समितीची बैठक लवकर बोलवावी अशा मागण्या यावेळी भारती चव्हाण यांनी केल्या.
राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार, असा प्रश्‍न चव्हाण यांना विचारला असता तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे सांगून पक्ष उमेदवार उभा करणार नाही; मात्र तशी वेळ आलीच तर पक्ष वेगळी भूमिकाही घेऊ शकतो, असे त्या म्हणाल्या. मिकी पक्षाचे आमदार आहेत, मात्र ते पक्षकार्यात सक्रिय नाहीत, असे उत्तर एका प्रश्‍नावर चव्हाण यांनी दिले.
देशप्रभू प्रकरणी हस्तक्षेप नाही
राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र देशप्रभू यांच्यावर भाईड - कोरगाव येथील बेकायदा खाण प्रकरणी चालू असलेल्या खटल्यात पक्ष हस्तक्षेप करणार नाही. कायदा आपले काम करेल, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी यावेळी दिली. पोलिस हवालदार चंद्रू गावस प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रवादी पक्षाने घेतली असून संबंधित अधिकार्‍यांना निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली.

No comments: