Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 3 July 2011

‘मुक्या’ मंत्री, आमदारांना अरबी समुद्रात बुडवा : काकोडकर

पणजी, दि. २ : कॉंग्रेसने इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा घाट घालून संस्कृती नष्ट करण्याचे व अराष्ट्रीयीकरणाचे जे धोरण आखलेले आहे त्या बाबतीत मौन धारण करून कॉंग्रेस पक्षातील हिंदू मंत्री व आमदारांनी गोमंतकीयांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. याची सव्याज परतफेड म्हणून गोव्यातील बहुसंख्याक हिंदू येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना गोव्याच्या कल्याणासाठी अरबी समुद्रात बुडवून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या निमंत्रक शशिकला काकोडकर यांनी दिला आहे. गोव्यातील बहुसंख्याक हिंदू आणि अल्पसंख्याक ख्रिश्‍चन यांच्यात कायमचे विभाजन करण्याचे खापर कॉंग्रेस पक्षाच्या माथ्यावर फोडले जाणार असल्याचे त्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
गोव्यातील बहुसंख्याक हिंदूंनी सासष्टीतील दिशाहीन, भ्रष्टाचारी व अराष्ट्रीय वृत्तीच्या ख्रिश्‍चन नेत्यांच्या दबावाला बळी पडलेल्या दुर्बळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी प्रदेश समितीचा सरकारच्या माध्यम निर्णयाला संपूर्ण पाठिंबा असल्यासंबंधी केलेल्या निवेदनाचा मंचाने तीव्र निषेध केला आहे.
‘बाबूशच्या दुःसाहसाला सडेतोड प्रत्युत्तर देऊ’
कोणत्याही एका सरकारी प्राथमिक शाळेत इंग्रजी माध्यमासाठी आवश्यक विद्यार्थिसंख्या न मिळाल्यास तशी संख्या इंग्रजी माध्यमास मिळविण्यासाठी आसपासच्या तीन किंवा जास्त सरकारी प्राथमिक शाळा विसर्जित करून एकत्र आणण्यात येतील, अशा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या विधानास भारतीय भाषा सुरक्षा मंचाने तीव्र आक्षेप घेतला आहे.
तशा प्रकारची प्रक्रियाही चालू करण्यात आल्याचे संकेत अधिकार्‍यांच्या निवेदनातून मिळत आहेत. आत्तापर्यंत सुरळीतपणे चालत आलेल्या सरकारी कोकणी, मराठी प्राथमिक शाळांचे सरसकट शिरकाण करण्याच्या या दुःसाहसाला योग्य प्रत्युत्तर देऊन, त्याचा प्रतिकार ठिकठिकाणी गोमंतकीय जनता करील, असा इशारा मंचाने दिला आहे.
केवळ अल्पसंख्याक मतपेटी सुरक्षित राखण्याकरिता कोकणी - मराठी शाळांचा बळी देऊन सरकारी प्राथमिक शाळांचे इंग्रजीत रूपांतर करण्याचे कॉंग्रेस सरकारने रचलेले हे कारस्थान गोमंतकीयांनी हाणून पाडावे, असे आवाहन मंचाचे कृतियोजना प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.

No comments: