भजनी कलाकारांसमोर कला अकादमी नमली
मातृभाषांचा जयजयकार,
मुख्यमंत्र्यांचा धिक्कार
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): गोव्यातील देदीप्यमान भजनी परंपरेचा अत्युच्च आविष्कार म्हणून प्रतिष्ठा लाभलेल्या स्व. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती भजनी स्पर्धेला गेल्या ३२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच तहकूब करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली. भाषा माध्यमप्रश्नी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी निषेधात्मक पद्धतीने या स्पर्धेत सहभागी होण्याचा बहुतांश भजनी पथकांनी धरलेला आग्रह कला अकादमीने मान्य केला नाही. भजनी मंडळ प्रमुखांना परोपरीने समजावण्याचा प्रयत्न विफल ठरल्यानंतर अखेर कला अकादमीचे सदस्य सचिव पांडुरंग फळदेसाई यांनी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले.
दरम्यान, स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे कला अकादमीने म्हटले असले तरी माध्यमप्रश्नी तसूभरही मागे हटण्यास नकार देणार्या भजनी कलाकारांच्या भूमिकेमुळे ही स्पर्धा यंदा तरी बारगळण्यातच जमा असल्याचे बोलले जाते आहे.
गेल्या आठवड्यात भारतीय भाषा सुरक्षा मंचाने आयोजित केलेल्या भजनी कलाकारांच्या मेळाव्यात सरकारच्या भजन स्पर्धेत दंडाला काळी फीत बांधून तसेच निषेधात्मक फलक घेऊन सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्पर्धेच्या अंतिम फेरीवर बहिष्कार घालण्याबरोबरच त्या दिवशी पणजीत भव्य दिंडी मिरवणूक काढण्याचेही ठरवण्यात आले होते. त्यामुळे अतिशय प्रतिष्ठेच्या अशा या भजन स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट पसरले होते. भजनी कलाकारांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे धास्तावलेल्या कला अकादमीने आज मंडळ प्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. परंतु, या बैठकीत भजनी मंडळाच्या प्रमुखांनी आपली भूमिका सोडण्यास साफ नकार दिल्याने अखेर कला अकादमीला नमते घ्यावे लागले व ही स्पर्धा तहकूब करावी लागली.
मातृभाषा व भजन यांचे अतूट नाते
कामत सरकारने इंग्रजी माध्यम लादून मराठी व कोकणी भाषा नष्ट करण्याचे कारस्थान रचले आहे. भाषा व भजन परंपरा यांचे अतूट नाते आहे. सरकारच्या या घातकी धोरणामुळे पुढील काळात मराठी व कोकणी भाषांबरोबरच भजन परंपराही धोक्यात येणार आहे. त्यामुळे दिगंबर कामत सरकार जोपर्यंत इंग्रजीचे तुष्टीकरण करण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत कलाकार सरकारचा निषेध करतच स्पर्धेत सहभागी होतील. स्पर्धा झालीच तर ती पर्वरीतील भजनी कलाकार मेळाव्यात घेतलेल्या निर्णयांनुसारच, असा निखालस पवित्रा आज कला अकादमीने बोलावलेल्या बैठकीत भजनी पथकांच्या प्रमुखांनी घेतला. त्यामुळे गोव्याच्या कलाक्षेत्रात मानाचे पान पटकावलेली व गेली ३२ वर्षे अखंडपणे सुरू असलेली ही भजन स्पर्धा अखेर तहकूब करण्यावाचून कला अकादमीपुढे पर्याय राहिला नाही.
सर्वांत मोठी स्पर्धा
दरम्यान, ही स्पर्धा तहकूब करावी लागल्यामुळे सरकारचे नाक कापले गेले आहे. दरवर्षी होणार्या या स्पर्धेत सुमारे ३००च्या आसपास भजनी पथके सहभागी होतात. संपूर्ण भारतात एवढ्या मोठ्या व्यापाची व हजारो कलाकार सहभागी होणारी ही एकमेव स्पर्धा आहे. सुरुवातीला फक्त पुरुषांसाठी घेण्यात येणार्या या स्पर्धेत कालांतराने महिला व बाल कलाकारांनाही सामावून घेतले गेले. विभागीय स्तरावर उत्कृष्ट ठरलेली १२ पुरुष पथके १५ ऑगस्ट रोजी कला अकादमीत होत असलेल्या अंतिम फेरीत विजेतेपदासाठी उतरतात. त्यापूर्वी महिला व बाल कलाकारांच्या स्पर्धेची अंतिम फेरी होते. या तिन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा १५ ऑगस्ट रोजी एकत्रितच पार पडतो. १९७८ साली सुरू झालेल्या या स्पर्धेचे हे ३३ वे वर्षे आहे. मात्र माध्यम प्रश्नावरून सरकारने मातृभाषाप्रेमींच्या भावना पायदळी तुडवल्यामुळे ही महास्पर्धा तहकूब करावी लागली आहे.
वाघांच्या धोरणाला पाठिंबा
गेल्या आठवड्यात पर्वरीत झालेल्या भजनी कलाकारांच्या मेळाव्यात बहुतेक पथकांनी या स्पर्धेवर सरसकट बहिष्कार घालण्याचे मत व्यक्त केले होते. मात्र विष्णू सुर्या वाघ यांनी पं. नाना शिरगावकर, पं. वामन पिळगावकर आदी ज्येष्ठ भजनी कलाकारांशी सल्लामसलत करून भजनी पथकांनी केलेली खडतर मेहनत वाया जाऊ नये म्हणून स्पर्धेवर सरसकट बहिष्कार न घालता निषेधात्मक सहभाग नोंदवण्याचा प्रस्ताव ठेवला होता व तो मान्य झाला होता. त्या मेळाव्यातील भूमिकेवर आज भजनी मंडळ प्रमुख ठाम राहिले.
आजच्या बैठकीत कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई व उपाध्यक्ष परेश जोशी यांनी भजनी पथकांना, ‘पारंपरिक भजन सादर करून स्पर्धा घेऊया’, ‘निषेधात्मक सहभाग नको’, ‘राजकारण्यांच्या नादी लागू नका’, ‘कला व भाषा हे वेगवेगळे विषय आहेत’ वगैरे सांगून त्यांचा बुद्धिभेद करण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण उपस्थितांनी, ‘भाषेशी गद्दारी करणार नाही’, ‘सहभागी होऊ, पण निषेध करतच’, असा ठोस पवित्रा घेतला. त्यांच्या या आवेशापुढे हतबल होत अखेर माध्यम प्रश्न निवळेपर्यंत ‘स्व. मनोहरबुवा शिरगावकर भजनी स्पर्धा २०११’ तहकूब करण्याचा ठराव परेश जोशी यांनी मांडला व त्याला सर्वांनी संमती दिली.
-----------------------------------------------------------
कलेत राजकारण आल्यामुळे भजन स्पर्धा पुढे ढकलल्याचे श्री. फळदेसाई यांनी सांगताच उपस्थितांनी त्याला जोरदार आक्षेप घेत राजकारणामुळे नव्हे तर, भाषाप्रेमींमुळे म्हणा, असा सल्ला दिला. सभागृहाबाहेर मराठी - कोकणीचा जयजयकार करत दिगंबर कामत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
-------------------------------------------------------------
कला अकादमीची कोलांटी!
राज्यभरातील भजनी पथकांनी भजनी परंपरेला अनुसरून या स्पर्धेत भाग घेण्याची तयारी दर्शवली होती. भाषा माध्यमप्रश्नी सरकारच्या विघातक निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी कलाकारांच्या मेळाव्यात घेतलेल्या ठरावाप्रमाणे निषेधात्मक सहभाग घेऊ, असेही स्पष्ट केले होते. परंतु, ही मागणी फेटाळून स्पर्धाच पुढे ढकलण्याचा निर्णय कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई यांनी जाहीर केला. यासंबंधी पाठवण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा प्रस्ताव प्रतिनिधींकडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु प्राप्त माहितीनुसार हा प्रस्ताव कला अकादमीचे उपाध्यक्ष परेश जोशी यांनी मांडला व तो अखेर संमत करण्यात आला. या स्पर्धेत भजनी पथकांना निषेधात्मक सहभागाची संधी दिल्यास सरकारची अधिकच बदनामी होईल,या भीतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचे भजनी पथकांनी सांगितले.
Thursday, 7 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment