Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 8 July 2011

भारती चव्हाण भू-माफिया : देशप्रभू

राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी विकोपाला
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): टायगर मेमन व दाऊद इब्राहिम अशा देशद्रोही घटकांशी संबंध ठेवणारे नेते आणि भू-माफिया, भ्रष्टाचारी व व्याजावर पैसे देणारे तथाकथित सावकार यांचा भरणा करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभारी भारती चव्हाण या पक्षाला कुठे नेत आहेत, असा सवाल उपस्थित करून पक्षाचे राष्ट्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांनी आपल्या टीकाकारांना शिंगावर घेतले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रभारीपद मिळवून भू- माफिया म्हणून कार्यरत असलेल्या या महिला नेत्यापासून पक्षाला वाचवा, अशी मागणी आपण पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.
आज इथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र देशप्रभू यांनी भारती चव्हाण यांच्या कारभारावर चौफेर हल्लाबोल केला. १७ जुलै रोजी दिल्लीत केंद्रीय कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत हे सर्व व्यवहार शरद पवार यांच्यासमोर ठेवणार असल्याचेही ते म्हणाले. विविध पदांसाठी व विधानसभेच्या उमेदवारीचे आमिष दाखवून या लोकांकडून जमीन, बंगले उकळण्याचा घाट श्रीमती चव्हाण यांनी घातला आहे, असा आरोप त्यांनी केला.
परुळेकरांचे घोटाळे सर्वश्रुत
सुरेश परूळेकर यांचे टायगर मेमन व दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेले संबंध सर्वांना परिचित आहेत. उद्योगमंत्री असताना त्यांनी केलेले घोटाळे लोकांच्या स्मृतीत आहेत. त्यांना पर्वरीची उमेदवारी देण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही देशप्रभूंनी केला. साधा वाहन चालक असलेला एक कथित नेता आता बिल्डर बनला आहे. त्याला साळगावची तिकीट देऊन त्या बदल्यात बंगला लाटण्याचा घाट घालण्यात आला असल्याचे ते म्हणाले. बिगर गोमंतकीय विभागाचे प्रमुखपद बहाल केलेले जोलापुरे हे व्याजावर पैसे देण्याचा धंदा करतात. जोलापुरे यांना पुढे करून एका कंपनीची स्थापना करण्यात आली असून त्याचे संचालकपद चव्हाण यांनी आपल्या मुलाला दिले आहे. पर्यटन खात्याअंतर्गत विविध प्रकल्पांचे कंत्राट या कंपनीला देण्याची योजना आखण्यात आल्याचा आरोपही श्री. देशप्रभू यांनी केला. आपल्यावर बेकायदा खाणीचा आरोप करणारे महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी पिळर्ण कोमुनिदादची सुमारे ५२ हजार चौरस मीटर जागा स्वतःचे सचिव ग्रेग फर्नांडिस यांच्या नावे करून याच व्यक्तीला प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्षपद देण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला.
भारती चव्हाण यांनी नियोजित पद्धतीने या लोकांना पुढे करून प्रभारीपद मिळवले. त्या पक्षाच्या साध्या सदस्य देखील आहेत की नाहीत, याबाबतच आपल्याला संशय आहे, असा टोलाही त्यांनी हाणला. सुरुवातीला गोव्यात आल्यानंतर आपल्याकडे किनारी भागांत जमीन घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. परंतु, देशप्रभू कुटुंबीय जमिनी कधीच विकत नाही, असे त्यांना ठणकावून सांगितल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा या लोकांकडे वळवला, असा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांच्यावर दबाव टाकून या लोकांचा भरणा करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
पक्षाचा वापर आपले वैयक्तिक हित साधण्यासाठी केला जात असताना आपण अजिबात गप्प बसणार नाही. कोणताही अधिकार नसताना व समाजात कोणतेही स्थान नसलेल्या लोकांना हाताशी धरून पक्षाचा कारभार चालवण्याचा हा प्रकार आक्षेपार्ह असून या पक्षात प्रवेश करणार्‍या लोकांना सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

No comments: