Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 9 July 2011

माध्यमप्रश्‍नी राजधानीत विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): कामत सरकारने प्राथमिक स्तरावर लागू केलेल्या इंग्रजी माध्यमामुळे येणारी पिढी मातृभाषांपासून कोसो मैल दूर जाणार आहे. या घातकी निर्णयामुळे गोव्याची संस्कृती धोक्यात आली आहे. रात्र वैर्‍याची आहे व म्हणूनच युवकांनी स्थानिक भाषांच्या रक्षणासाठी डोळ्यांत तेल घालून जागे राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार संजय हरमलकर यांनी आज केले.
गोवा विद्यापीठातील भाषाप्रेमी विद्यार्थ्यांनी गोवा सरकारच्या भाषा माध्यम निर्णयाचा निषेध करण्यासाठी पणजीत भव्य मोर्चा व निषेध सभेचे आयोजन केले होते. आझाद मैदानावर या सभेचे उद्घाटन केल्यानंतर श्री. हरमलकर बोलत होते. सरकारच्या निर्णयाचा सर्व स्तरातून निषेध होतो आहे. साहित्यिक, कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ आदींनी सरकार विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. मात्र, तरीही सरकार त्यांची दखल घेण्यास तयार नाही. म्हणूनच आता युवा पिढीही कंबर कसून पुढे सरसावली आहे. युवकांनी हा लढा आता नेटाने पुढे न्यावा, असे आवाहन यावेळी श्री. हरमलकर यांनी केले.
गोवा विद्यापीठातील साहित्य शारदा मंडळ-मराठी विभाग, कोकणी सारस्वत मंडळ-कोकणी विभाग आणि हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावर ही सभा आयोजित केली होती. संजय हरमलकर यांनी चित्र काढून या सभेचे उद्घाटन केले.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी माध्यम प्रश्‍नावर आपली मनोगते व्यक्त केली. पुणे, धारवाड येथील विद्यापीठांना भेट दिली असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की, तेथील सूचना फलक प्रादेशिक भाषांतूनच लावले आहेत. केवळ गोवा विद्यापीठात ते इंग्रजीतून लावलेले आहेत. त्यावरून गोवा विद्यापीठाने इंग्रजीच्या कुबड्या आधीपासूनच लावल्याचे स्पष्ट होते आहे, असे एका विद्यार्थ्याने यावेळी सांगितले. एकाने एकपात्री प्रयोगातून सरकारच्या माध्यम निर्णयाचा निषेध केला.
गोवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या निषेध कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी अनेक उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम त्यांनी कला अकादमी, शिक्षण संचालनालय ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढला. संध्याकाळी सरकारच्या माध्यम धोरणाचा निषेध करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटी उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालयांना भेट देऊन याप्रश्‍नी विद्यार्थ्यांत जागृती करण्याचा व सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक भैय्या देसाई, अरविंद भाटीकर, सौ. भाटीकर आदी मान्यवरांचीही उपस्थिती होती.

No comments: