पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारणार : नीळकंठ हळर्णकर
पणजी,दि. ७ (प्रतिनिधी): गोव्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या पर्यटनक्षेत्राचा नियोजनबद्ध विकास करून एक आंतरराष्ट्रीय दर्जेदार व कौटुंबिक स्थळ म्हणून राज्याची ओळख निर्माण करण्याचा निर्धार पर्यटन खात्याने व्यक्त केला आहे. पर्यटन खात्याअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कृती दलामार्फत विविध पर्यटन प्रकल्प तथा अत्यावश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एक ठोस कार्यक्रम आखण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.
आज इथे आयोजित केलेल्या खास पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर बोलत होते. याप्रसंगी पर्यटन सचिव डी. सी. साहू, खात्याचे संचालक स्वप्निल नाईक व ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल एजन्सी’चे राल्फ डिसोझा हजर होते. राज्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. २०१० यावर्षी सुमारे २६ लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिल्याची नोंद झाली आहे. त्यात १७ टक्के विदेशी तर ३.५ टक्के देशी पर्यटकांत वाढ झाल्याचेही ते म्हणाले. पर्यटनाचा विकास करताना जास्तीत जास्त खाजगी कंपन्यांना सहभागी करून विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. कोणत्याही स्थितीत राज्य सरकार शंभर टक्के गुंतवणूक करणार नाही; तसेच प्रकल्पांसाठी भूसंपादनही करणार नाही. किनारी पर्यटनाबरोबरच ग्रामीण भागातील पर्यटनाला मुख्य प्रवाहात आणले जाईल. त्यासाठी ग्रामीण भागांतील पुरातन वास्तू तथा गेस्ट हाऊससाठी खास अनुदान दिले जाणार आहे.
याप्रसंगी पर्यटन खात्यामार्फत हाती घेण्यात येणार्या विविध प्रकल्पांबाबत माहिती देताना संचालक स्वप्निल नाईक म्हणाले की, गोल्फ कोर्स, रेसकोर्स, हेलिकॉप्टर पर्यटन, रोप व्हे आदींचा नव्या प्रकल्पांत प्रामुख्याने समावेश असेल. गोव्याच्या पर्यटनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहिरात करण्यासाठी खास ट्रॅव्हल चॅनलवर जाहिरात करण्यात येणार आहे. प्रिन्स जॅकोब यांच्या सहकार्याने पर्यटनाबाबत जागृती करण्यासाठी तसेच गोमंतकीय लोकांत पर्यटकांबाबत घेण्यात काळजीबाबत जाहिराती तयार करण्यात आलेल्या आहेत. विदेशी पर्यटनांबरोबर देशी पर्यटकांसाठीही अनेक योजना राबवण्यात येणार आहेत.
शिष्टमंडळ नवारा येथे जाणार
पर्यटन उद्योगासाठी उपयुक्त ठरणार्या अपारंपरिक ऊर्जा तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्यासाठी स्पेन येथील नवारा येथे लवकरच एक शिष्टमंडळ भेट देणार आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे जन्मस्थळ असलेल्या नवारा येथे अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत युरोपात आदर्श निर्माण केला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर गोव्याला होणार काय,याचा अभ्यास केला जाईल.
१४ पर्यटक साहाय्य केंद्रे
राज्यात विविध ठिकाणी १४ पर्यटक साहाय्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सीफुड महोत्सव तथा बीच फुटबॉल व बीच क्रिकेटलाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी अनेकांनी पर्यटन खात्याकडे संपर्क साधला असून त्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने राबवलेल्या ‘अतिथी देवो भवः’ ही मोहीम गोव्यातही राबवण्याचा मनोदय असल्याचे ते म्हणाले. यावेळी गेल्यावर्षी पर्यटन खात्याने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. पर्यटन सचिव डी. के. साहू यांनी यावेळी वाढत्या स्पर्धेचा उल्लेख करून या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी गोव्याला पर्यटनात बदल करावे लागणार असल्याचे सांगितले.
Friday, 8 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment