हवाई सुंदरी प्रशिक्षण अकादमीने गुंडाळला गाशा
मडगाव, दि. ३० (प्रतिनिधी): विदेशात नोकर्यांचे आमिष दाखवून फसविण्याच्या प्रकारांवर मात करणारे एक प्रकरण मडगावात उघडकीस आले आहे. हवाई सुंदरी प्रशिक्षण देण्याचे आश्वासन देऊन यंदा १२५ विद्यार्थ्यांकडून सुमारे एक कोटीची रक्कम उकळलेल्या एका आस्थापनाने कालपासून आपल्या येथील कार्यालयाला टाळे ठोकले आहे. यामुळे तेथे प्रशिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी सध्या वार्यावर पडले आहेत.
आज या विद्यार्थ्यांनी पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली व जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली. त्यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार पाजीफोंड येथे रेमंड शोरूमच्या मागील बाजूच्या इमारतीत असलेल्या सदर अकादमीचे उद्घाटन २००८ मध्ये मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केले होते. या संस्थेत विमान वाहतुकीतील ३ वर्षे, २ वर्षे व १ वर्ष कालावधीचे विविध अभ्यासक्रम असल्याचे सांगण्यात आले होते. यासाठी कालावधी प्रमाणे एक लाखापासून शुल्क आकारले गेले होते. पण प्रत्यक्षात कसलेच प्रशिक्षण दिले गेले नाही, परीक्षाही घेतल्या गेल्या नाहीत की प्रमाणपत्रे दिली गेली नाहीत. याबाबत विचारणा केल्यास वेळ मारून नेणारी उत्तरे देण्यात आली.
विमानतळावरील विविध भागात असे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना विमानात व विमानतळावर नोकर्या, लोकसंपर्काचे प्रशिक्षण, इंग्रजी व फ्रेंच संभाषण कला, दहावीˆबारावी उत्तीर्ण मुलांना विशेष प्रशिक्षण अशी आश्वासनेही दिली गेली होती; पण प्रत्यक्षात एकही आश्वासन पाळले गेले नाही. उलट कालपासून कार्यालयाला टाळे ठोकून एक प्रकारे अफरातफरीचा प्रकार केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून उमेश गावकर यांनी तेथे रिसेप्शनिस्टचे काम करणार्या महिलेला पाचारण करून तिची चौकशी केली पण ती विशेष काही सांगू शकली नाही. यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पोलिसांनी सदर महिलेला सर्व कागदपत्रे घेऊन उद्या पुन्हा पाचारण केले आहे. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंदविला जाणार आहे.
दरम्यान, साधारण दीड वर्षांपूर्वी या आस्थापनाविरुद्ध अशीच तक्रार शहरातील एका बिगरसरकारी संघटनेच्या महिला कार्यकर्त्याने पोलिसांत केली होती. तिची चौकशी होण्यापूर्वीच उभयतांमध्ये समेट झाल्याचे सांगून मागेही घेण्यात आली होती. यामुळे सदर तक्रारीची नव्याने चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सदर आस्थापनाने देशाच्या सर्व राज्यात व विदेशातही आपली कार्यालये असल्याची जाहिरात केली होती; पण पोलिसांनी केलेल्या चौकशीत तशी कार्यालये नसल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या संचालकांबाबत सदर रिसेप्शनिस्टला विशेष काहीच माहिती नाही. ते एक जोडपे असून ते विदेशात असते एवढीच माहिती ती देऊ शकली. या लोकांनी मुलांकडून घेतलेल्या शुल्काच्या बदली त्यांना पोचपावती, माहितीपुस्तिका वगैरे काहीच दिलेले नाही. यामुळे त्यांच्याकडे लेखी स्वरूपात काहीच पुरावा नाही व त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत.
सदर आस्थापनात प्रवेश घेतलेल्यांमध्ये समाजातील सामान्य वर्गातील मुलेही आहेत व त्यांच्या पालकांनी लठ्ठ पगाराच्या आशेने लाखभराचे कर्ज घेऊन त्यांना या वर्गात प्रवेश मिळवून दिला होता. यामुळे या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान संबंधित अधिकार्यांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान या आस्थापनाचे पणजीतही असेच एक कार्यालय होते व ते तीन वर्षांमागे अशाचप्रकारे बंद करण्यात आले होते.
Wednesday, 1 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment