पणजी, दि. १ (प्रतिनिधी): अट्टल गुन्हेगार आणि ‘सुपारी किलर’ अश्पाक बेंग्रे न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या उपस्थितीत त्याच्या टोळीतील मित्रांना आणि अन्य तुरुंगात असलेल्या आरोपींना भेटत असल्याचे उघडकीस आले आहे. अशाच भेटीतून यापूर्वी अश्पाक बेंग्रे याने न्यायालयाच्या आवारातच हल्ला प्रकरण घडवून आणले होते. यातून कोणताही बोध न घेतलेल्या पोलिसांनी पुन्हा त्याच पद्धतीने अश्पाक याला न्यायालयाच्या आवारात भेटण्यासाठी ‘मोकळीक’ देण्यास सुरुवात केली आहे.
अश्पाकला भेटण्यासाठी न्यायालयात येत असलेल्या तरुणांना बिनधास्तपणे भेटण्याची परवानगी दिली जाते. त्याच्या खटल्याची सुनावणी झाली तरी, न्यायालयाच्याच आवारात मित्रांना भेटण्यासाठी त्याला मुद्दामहून ठेवले जाते, अशी माहिती न्यायालयातूनच मिळाली आहे. आज दुपारी त्याला अर्धा तास मोकळेच ठेवण्यात आले. यावेळी त्याला भेटण्यासाठी तिघे तरुण आले होते. यातील एक आग्वाद तुरुंगातील कैदी तर, दुसरा तरुण दुसर्या तुरुंगात असलेला कैदी आहे. या व्यतिरिक्त त्याचे मडगाव व वास्को शहरातील मित्र त्याला या ठिकाणी भेटायला आले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांच्या न्यायालयाच्या बाहेर त्याची मित्रमंडळींशी चर्चा सुरू होती. मात्र त्यांच्यात काय चर्चा झाली हे कोणालाच कळू शकले नाही. आणि पोलिसांनाही त्यांच्यामध्ये होत असलेल्या चर्चेत रस नसल्याचे दिसून येत होते. त्यांच्यामध्ये सुरू असलेली चर्चा संपल्यानंतर एकाने त्यांना शीतपेयाच्या दोन बाटल्या आणून दिल्या तर, एकाने एका पिशवीत ‘ट्रॅक पँट’ आणून दिली. या दोन्ही वस्तू ते आपल्याबरोबर घेऊन गेले.
आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर त्यांना एकमेकांना भेटण्याची आयती संधी उपलब्ध होते आणि यातूनच ‘प्लॅन’ तयार होतात. तुरुंगात असलेल्या या गुन्हेगारांची कार्यपद्धत अनेक प्रकरणात उघडकीस आली आहे. त्यामुळे या प्रकाराला वरिष्ठ अधिकारी कोणाला जबाबदार धरणार, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Thursday, 2 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment