चोरट्यांच्या हल्ल्यात गावकरी जखमी
आतील कपाट फोडून १५ हजार पळवले
फोंडा, दि.२७ (प्रतिनिधी): दुर्भाट आडपई येथील डोंगरावर नव्याने बांधण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिरात आज (दि.२७) दुपारी अडीचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवालयात उपस्थित असलेल्या एका गावकऱ्याला जबर मारहाण करून देवालयातील कपाट फोडले आणि आतील रोख पंधरा हजार रुपयांसह पोबारा केला. दिवसाढवळ्या झालेल्या ह्या चोरीच्या घटनेमुळे आडपई, दुर्भाट, वाडी आदी भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
फोंडा भागातील देवालयातील चोऱ्यांचे सत्र सुरू असून चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश प्राप्त झालेले नाही. यासंबंधी देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्र्वनाथ नाईक यांनी तक्रार दाखल केली आहे. रघुवीर नाईक (७०) असे मारहाणीत जखमी झालेल्या गावकऱ्याचे नाव आहे. देवालयात रघुवीर नाईक हे वामकुक्षी घेत होते. त्यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आल्याने बेशुद्धावस्थेत पडून होते. हे देवालय दिवसभर उघडे असते. गावातील एखादा नागरिक ह्या ठिकाणी दिवसा उपस्थित असतो. देवालयात चोऱ्यांच्या घटना घडू लागल्याने रात्रीच्या वेळी देवालयात स्थानिक नागरिक झोपतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली. देवालयातील चोरी हा चर्चेचा विषय बनला आहे. दुपारी तीनच्या सुमारास देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्र्वनाथ नाईक यांनी ह्या घटनेची माहिती मिळाली. ह्या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी देवस्थानच्या आवारात गर्दी केली होती. फोंडा पोलिसांनी ह्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन तपास कामाला सुरुवात केली. चोरट्यांचा थांगपत्ता लागू शकला नाही. चोरट्यांनी देवालयातील मूर्तीला हात लावला नाही. फक्त कपाट फोडून आतील रक्कम पळवली. चोरटे किती होते, कुठून आणि कसे आले, याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकली नाही.
चोरटे दुचाकी वाहनावरून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रघुवीर नाईक यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आल्याने चोरटे किती होते हे त्यांना पाहता आले नाही. निरीक्षक सी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, उपनिरीक्षक संजय दळवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.
Sunday, 28 November 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment