पणजी, दि. २ (प्रतिनिधी)- कुविख्यात गुंड अश्पाक बेंग्रे याला बिनधास्तपणे न्यायालय आवारात त्याच्या मित्रांना तसेच अन्य कैद्यांना भेटायला दिले जात असल्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली असून अश्पाकला काल न्यायालयात घेऊन गेलेल्या प्रत्येक पोलिसाकडून स्पष्टीकरण घेतले जाणार असल्याचे आज संरक्षक विभागाचे पोलिस अधीक्षक डी. के. सावंत यांनी स्पष्ट केले. कैद्यांना त्यांच्या मित्रांनी भेटण्यासाठी न्यायालयाच्याच आवारात कशी मोकळीक दिली जाते, हा प्रकार ‘गोवा दूत’ने छायाचित्रासह उघडकीस आणला होता. याची दखल पोलिस खात्याने घेतली आहे.
‘कुविख्यात गुन्हेगारांना अशा पद्धतीने भेटायला देणे अत्यंत गंभीर आहे. यामुळे या घटनेची नक्कीच चौकशी होणार. तसेच, या पुढे असे घडणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, असा दावा अधीक्षक सावंत यांनी ‘गोवादूत’शी बोलताना केला. यामुळे त्या पोलिसांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अश्पाक बेंग्रे याच्यावर खून, दरोडे आदी गंभीर गुन्हे असून यापूर्वी त्याने त्याच्या विरोधात साक्ष देण्यासाठी न्यायालयात येणार्या साक्षीदारांवर प्राणघातक हल्ले घडवून आणले आहेत. या हल्ल्याची आखणी त्याने सुनावणीसाठी न्यायालयात नेले जात असताना, त्याला भेटण्यासाठी येणार्या मित्राच्या मदतीने केली होती. जलद गती न्यायालयाच्या आवारात हे कटकारस्थान शिजले होते. आता पुन्हा त्याच पद्धतीने अश्पाक याला जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात पोलिस बेधडकपणे त्याच्या मित्रांना तासन तास भेटण्याची परवानगी देत आहेत. यामुळे, अनुभवावरूनही पोलिस खाते बोध घेत नसल्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
Friday, 3 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment