संरक्षक भिंत उभारल्याने
पणजी, १ (प्रतिनिधी): शेजारच्या बंगल्याची वाट अडवून त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारली जात असल्याने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना गोवा खंडपीठाने नोटीस बजावली आहे. तसेच, या संरक्षक भिंतीच्या बांधकामाला स्थगिती देण्यात आली आहे.
सदर मंत्री विविध प्रकारे आपला छळ करीत असल्याचा दावा करून आपल्या बंगल्याची वाट अडवण्यात आली आहे, असे दोनापावला येथील आन्तोनियो रुझारीयो यांनी गोवा खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाने बांधकामाला स्थगिती देण्याबरोबरच मंत्री राणे व उत्तर गोवा विकास प्राधिकरण मंडळाला नोटीस बजावली. तसेच, येत्या ११ जानेवारी २०११ पर्यंत नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या दोनापावला येथील बंगल्याच्या शेजारी आपला बंगला आहे. गेल्या काही वर्षांपासून ते आपला बंगला विकत घेण्यासाठी दबाव आणीत आहे. आपण त्यांना बंगला विकायला तयार नसल्याने त्यांनी आपल्या बंगल्यात जाणारी वाट अडवून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे. तसेच, पोलिस, पंचायत यांचा वापर करून आपला छळ करीत असल्याचा दावा याचिकादाराने आपल्या याचिकेत केला आहे.
मंत्री ज्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारत आहेत ती जागा अगदी आपल्या बंगल्याच्या समोर आहे. तसेच, ती जागा हरित क्षेत्रात येते. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही बांधकाम करता येत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांचे बळ वापरून बंगल्यासमोर उभी करून ठेवलेली आपली ऑटोमॅटिक मर्सीडीज गाडी उचलून (टो) नेण्यात आली. यामुळे वाहनाची हानी झाली. या विषयीची आपली कोणतीही तक्रार पणजी पोलिस नोंद करून घेत नाही, असा दावा त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
आज सकाळी सदर प्रकरण सुनावणीस आले बांधकाम सुरू असलेली जागा कोणत्या क्षेत्रात येते याची माहिती देण्याची सूचना उत्तर गोवा विकास प्राधिकरण मंडळाला देण्यात आली आहे.
Thursday, 2 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment