पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) : आज प्रत्येक पक्षात राजकीय शुद्धीकरण होण्याची अत्यंत आवश्यकता असून प्रत्येक पक्षाने भ्रष्टाचारी, गुन्हेगार आणि चारित्र्यहीन नेत्यांची आपल्या पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी; असे करणाऱ्या पक्षालाच आमचा पाठिंबा असेल, असे प्रतिपादन योगगुरू रामदेवबाबा यांनी आज केले.
फोंडा - फर्मागूढी येथे उद्या (दि. १) पहाटेपासून चार दिवस सुरू होणाऱ्या योग प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी रामदेवबाबा यांचे आज दुपारी गोव्यात आगमन झाले. त्या निमित्त दुपारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"मला पंतप्रधान किंवा राष्ट्रपती व्हायचे नाही, ही माझी भीष्मप्रतिज्ञा आहे. मला योगाच्या बळावर देशातील तरुणांमध्ये नवा जोश आणावयाचा आहे. विदेशी बॅंकांतील काळे धन भारतात आणावयाचे आहे; भ्रष्टाचार आणि दहशतवाद संपवण्यासाठी दोषींना मृत्युदंडाचीच शिक्षा दिली गेली पाहिजे. आग्रहपूर्वक मांडत असलेल्या या भूमिकेमुळे रामदेवबाबा अनेकांना खटकतोय. त्यामुळे माझ्या जिवाला कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याला केंद्रातील सत्ताधारी पक्षच जबाबदार असेल', असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी आपल्या नव्या पक्षाचे सुतोवाच करताना ते म्हणाले की, भारत स्वाभिमान ट्रस्टतर्फे काढला जाणारा राजकीय पक्ष हा राजकीय शुद्धीकरणासाठी असेल. कोणत्याही राजकीय पक्षातील चांगल्या राजकीय नेत्याने त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र, जे भ्रष्ट आणि गुन्हेगारी स्वरूपाचे नेते आहेत, त्यांची मात्र खैर नाही, असा इशारा त्यांनी दिला.
येत्या लोकसभा निवडणुकीत ५४३ उमेदवार पक्षातर्फे रिंगणात उतरवले जातील किंवा ज्या राजकीय पक्षात चांगले उमेदवार असेल त्यांना पाठिंबा दिला जाईल; कोणत्याही राज्यातील विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवणार नसल्याचेही रामदेवबाबा यांनी यावेळी सांगितले.
एका व्यक्तीची ७२ हजार कोटी एवढी रक्कम विदेशी बॅंकेत आहे. चोरांना आम्ही देशाची तिजोरी राखण्याची जबाबदारी दिली आहे. काही चांगले राजकीय नेतेही या देशात आहेत. परंतु, त्यांची संख्या एकदम कमी आहे. त्यांना बहुमतात आणले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
योगामुळे व्यक्तीचे आचार विचार चांगले होतात. रोग दूर होतो. हा चमत्कार नसून हे एक विज्ञान आहे. योग ही जीवनपद्धती आहे. भोजन भरपूर आहे पण भूक नाही, तर त्या भोजनाचा कोणताही उपयोग नाही. खरा स्वाद हा भोजनात नाही तर, तो भुकेत असतो, असे ते पुढे म्हणाले. गोव्यात सध्या ६३० योग केंद्रे नियमित सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. भाषा, संस्कृती, जाती यामुळे दूर गेलेले हे सर्व या योगामुळे पुन्हा एकत्रित आले आहेत. योग शिबिरात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे ते शेवटी म्हणाले.
Saturday, 1 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment