पर्रीकरांचा पोलिसांना खडा सवाल
ड्रग माफिया प्रकरण
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): अमलीपदार्थ व्यवहारप्रकरणी राजकीय नेत्याच्या मुलाचा सहभाग नाही, असे ठामपणे सांगणारे गुन्हा विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर कुणाची पाठराखण करीत आहेत, असा थेट सवाल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला आहे. अटालाची प्रेयसी लकी फार्महाऊस हिने यासंबंधी केलेले वक्तव्य अवघ्या चोवीस तासांच्या आत खोडून काढण्याची घाई श्री. साळगावकर यांना का झाली, याचा अर्थ ही व्यक्ती कोण ते त्यांना कदाचित ठाऊक असावे, असा टोलाही पर्रीकर यांनी हाणला. या एकूण प्रकरणांत स्थानिक पोलिस गुंतले आहेत व त्यामुळे हे प्रकरण दडपून टाकण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असून याची चौकशी "सीबीआय' कडेच सोपवावी, असा पुनरुच्चार पर्रीकर यांनी केला.
आज भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर बोलत होते. यावेळी सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते.एक आमदार व विरोधी पक्षनेते या नात्याने विधिमंडळ अधिकारांचा वापर करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू, असा निर्धार पर्रीकर यांनी केला. गृह खात्याच्या अस्थायी समितीचा अध्यक्ष या नात्याने आपण हे प्रकरण गंभीरपणे घेणार आहे. एवढे करूनही यश मिळत नसल्यास हे प्रकरण "सीबीआय' कडे सोपवण्याची याचिका उच्च न्यायालयात सादर करणार आहोत, असेही पर्रीकर म्हणाले. मुळात एखाद्या प्रकरणात स्थानिक पोलिस गुंतले असता त्या प्रकरणाची चौकशी स्थानिक पोलिसांकडून काढून अन्य तपासयंत्रणेकडे सोपवण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी, पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव किंवा मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांना ही माहिती असतानाही ते का गप्प आहेत,असेही पर्रीकर म्हणाले. गृहमंत्री रवी नाईक यांनी एव्हाना हे प्रकरण "सीबीआय' कडे सोपवणे गरजेचे होते परंतु ते नेमके का अडखळत आहेत, असा सवाल पर्रीकर यांनी केला. गृहमंत्र्यांच्या या कृतीमुळे संशयाची सुई त्यांच्या दिशेनेही वळत असल्याचेही पर्रीकर म्हणाले. कोणत्या राजकीय नेत्याचा मुलगा या प्रकरणात गुंतला आहे त्याची जाहीर वाच्यता सार्वजनिक ठिकाणी होते आहे, त्यामुळे त्याच्याकडे सरळ अंगुलिनिर्देश न करता पोलिस तपासातूनच या व्यक्तीचे नाव उघड होणे उचित ठरेल,असेही यावेळी पर्रीकर म्हणाले.सार्वजनिक जीवनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीने एखाद्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सदैव तयार असावे लागते,असे सांगून या प्रकरणात काही नेते नेमके का दचकत आहेत, असा सवालही पर्रीकर यांनी केला. या प्रकरणात फरारी असलेला पोलिस शिपाई संजय परब हा पोलिसांच्या आशीर्वादानेच गायब आहे, असा आरोपही पर्रीकर यांनी केला. राज्य सरकार या प्रकरण दडपडण्यासाठी जिवाची पराकाष्ठा करीत आहे. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी "सीबीआय' कडे सोपवण्यात येत नाही तोपर्यंत त्याचा छडा लागणार नाही, असेही यावेळी पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
पर्रीकरांची मागणी रास्तः लवू मामलेकर
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी अमलीपदार्थ व्यवहार प्रकरणी पोलिस व माफिया साटेलोटे प्रकरणाचा तपास "सीबीआय' कडे सोपवण्याची केलेली मागणी पूर्णपणे रास्त आहे, अशी प्रतिक्रिया मगोचे खजिनदार तथा माजी पोलिस उपअधीक्षक लवू मामलेकर यांनी व्यक्त केली आहे. एकेकाळी अमलीपदार्थ व्यवहार विभागाचे निरीक्षक म्हणून काम केलेल्या लवू मामलेकर यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात गुंतलेला सदर मुलगा मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याचा असेल तर त्या मंत्र्याला तात्काळ डच्चू देऊन या प्रकरणाची चौकशी निःपक्षपातीपणे करण्यास मोकळीक द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. किनारी भागात अमलीपदार्थ व्यवहारात गुंतलेल्या प्रत्येकाकडून सदर राजकीय नेत्याच्या मुलाचे नाव घेतले जाते. अटालाची प्रेयसी लकी फार्महाऊस हिने उघड केलेल्या चित्रफितीतही या राजकीय नेत्याच्या मुलाच्या नावाचा उल्लेख झाला आहे व त्याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे,असेही यावेळी श्री.मामलेकर म्हणाले. सध्या फरारी असलेला पोलिस शिपाई संजय परब याला याच राजकीय नेत्याचा आश्रय असणे शक्य आहे. संजय परब हा शिपाई पोलिसांच्या हाती सापडल्यास आपोआप सदर राजकीय नेत्याच्या मुलाचे नाव उघड होईल या भीतीनेच त्याला अभय देण्यात येत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
Thursday, 29 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment