भोम येथे ट्रकची मिनिबसला धडक
फोंडा, दि. २६ (प्रतिनिधी): पणजी ते फोंडा महामार्गावरील भोम पंचायतीजवळील धोकादायक वळणावर आज संध्याकाळी पावणेचारच्या सुमारास प्रवासी मिनिबस (जीए ०१ टी ७२५४) आणि मालवाहू ट्रक (एम.पी. ०७ केबी १७७६) यांच्यात झालेल्या अपघातात मिनिबसच्या चालकासमवेत बारा ते पंधरा जण जखमी झाले आहेत.
या अपघातात मिनिबसचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे फोंडा ते पणजी महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन ते अडीच तास खोळंबून पडली.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी मिनिबस पणजी येथून फोंड्याला येत होती. तर मालवाहू ट्रक कुंडई येथून बाणस्तारीला जात होता. भोम येथील पंचायतीजवळील धोकादायक वळणावर मालवाहू ट्रकने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मिनिबसला जोरदार धडक दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालवाहू ट्रकची जोरदार धडक बसल्याने प्रवासी मिनिबसचा चालक केबिनमध्ये अडकून पडला. फोंडा अग्निशामक दल, फोंडा पोलिस व ग्रामस्थांनी केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकाला केबिनमधून बाहेर काढून इस्पितळात दाखल केले. या अपघातात मिनिबसचा क्लीनरही जखमी झाला आहे. त्याचबरोबर मिनी बसमधील बऱ्याच सीट उखडल्या गेल्याने बरेच प्रवासीही जखमी झाले आहेत. यात लहान मुलांचा समावेशही आहे. जखमींना १०८ रुग्णवाहिका व खासगी वाहनांतून वैद्यकीय उपचारांसाठी इस्पितळात नेण्यात आले. मात्र जखमींबाबत कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडे उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती. जखमी मिनी बसच्या चालकाचे नावही पोलिसांना समजू शकले नव्हते.
दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले. ट्रकचा क्लीनर मात्र संतप्त लोकांच्या हातात सापडला. त्याला लोकांनी मारहाण केली. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी पंचनामा केला आहे.
Tuesday, 27 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment