पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): कदंब महामंडळ कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंबंधी उद्या ३० रोजी कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला सरकार व कदंब व्यवस्थापन यांच्यात स्वाक्षऱ्या होणार आहेत. आपल्या न्याय्य मागण्या मान्य होत नाहीत म्हणून संतप्त बनलेल्या कामगारांसमोर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अखेर ही घोषणा करणे भाग पडले. कदंब महामंडळाच्या वर्धापनदिनापासून आत्तापर्यंत अनेकवेळा यासंदर्भात केवळ घोषणा केल्या गेल्या. मात्र त्यांची पूर्तता सरकारकडून होत नव्हती. सरकारकडून होत असलेल्या या घोर उपेक्षेचा वचपा काढण्यासाठीच या कामगारांनी मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले होते व ही मागणी पूर्ण न झाल्यास सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. अखेर कामगारांच्या या आक्रमक पावित्र्यासमोर नमते घेत उद्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यास सरकार राजी झाले आहे.
कदंब महामंडळ कर्मचारी संघटनेचे नेते ज्योकीम फर्नांडिस, "आयटक' चे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, ऍड. राजू मंगेशकर, ऍड. सुहास नाईक, कदंबचे नेते गजानन नाईक व इतरांनी आज दुपारी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी निवासस्थानी ठिय्या मांडला. कदंब महामंडळ कामगारांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी ताबडतोब लागू करा; अन्यथा सोमवार दि. ३ मेपासून संपावर जाण्याचा इशाराच संघटनेतर्फे देण्यात आला व त्यामुळे सरकारला नमते घेणे भाग पडले. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर, कदंब महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो, वाहतूक संचालक, कामगार आयुक्त व कामगार संघटनेचे पदाधिकारी यांची प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीत सरकारकडून कशा पद्धतीने कदंबच्या कामगारांची उपेक्षा सुरू आहे याचा पाढाच श्री. फोन्सेका यांनी वाचला. मुख्यमंत्री कामत या शिफारशी लागू करण्यासाठी आणखी थोडा अवधी हवा, असे सांगत होते पण कोणत्याही परिस्थितीत आता सरकारची ही सोंगे खपवून घेणार नाही, अशी तंबीच कामगार संघटनेतर्फे देण्यात आल्याने अखेर उद्या ३० रोजी करारावर स्वाक्षऱ्या करण्यास सरकारने मान्यता दिली.
Friday, 30 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment