वेर्णा व फोंडा अपघातप्रवण क्षेत्र
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): राज्यात रस्ता अपघातात सापडणारे ५७ टक्के हे केवळ २० ते ३५ वयोगटातील युवक असल्याचे स्पष्ट झाले आहे. एखाद्या कुटुंबातील एक युवक बळी जाणे हे केवळ त्या कुटुंबावरील संकट नव्हे तर त्याचे सामाजिक, आर्थिक व इतरही अनेक दूरगामी परिणाम होतात.गेल्या २००९ साली प्रत्येक दिवशी १२ अपघातांची नोंद झाली आहे व प्रत्येक २९ तासांत एकाचा बळी गेला आहे.जानेवारी ते डिसेंबर २००९ यावर्षी एकूण ४१६४ रस्ता अपघात घडले व त्यात ३१० जणांचा मृत्यू झाला.२००८ साली ४१७८ अपघातात ३१८ जण मृत्यू पडले व २००७ साली ३२२ जणांना आपले प्राण घालवावे लागले.२००९ साली झालेल्या अपघातांत ३७ टक्के दुचाकींचा समावेश आहे तर ३० टक्के कार अपघात घडले आहेत.सर्वांत जास्त अपघात वेर्णा येथे घडले असून फोंडा परिसरातील अपघातांत सर्वांत जास्त जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
राज्यात सध्या राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणावरून बराच गदारोळ उडाला आहे. कुणी म्हणतात या रुंदीकरणामुळे अपघात टळतील तर कुणाचे म्हणणे आहे की त्यामुळे अधिक अपघात घडतील. एक गोष्ट मात्र कुणीही नाकारू शकत नाही की गोव्यातील बहुतांश लोकांना रस्त्यावरील मरणाला सामोरे जावे लागत आहे. वर्षाकाठी शेकडो तरुण अपघातांना बळी पडत असताना व त्यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत असताना सर्वांत गंभीर व चिंताजनक बनलेल्या या प्रकाराकडे आपले सरकार अजूनही गंभीर नसल्याचेच दिसून येते. माहिती अधिकाराखाली प्राप्त झालेल्या यासंबंधीच्या माहितीवरून कुणाचीही झोप उडावीच एवढे भीषण हे संकट बनले आहे.
वाढते रस्ता अपघात टाळण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले सर्व प्रयत्न अपुरे पडत आहेत. वाहतूक खाते, पोलिस खाते व सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यात अजिबात समन्वय नाही. गेल्या २००९ साली वाहतूक पोलिसांकडून एकूण ३९४ जणांचा वाहन चालक परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर १० मार्च २०१० पर्यंत ७९ वाहन चालकांचा परवाना रद्द करण्याची शिफारसही वाहतूक पोलिसांनी वाहतूक खात्याकडे केली आहे. हे सर्व चालक मृत्यूस व भीषण अपघातांस कारणीभूत ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहतूक पोलिसांनी केलेल्या या शिफारशींवर सुनावणी घेण्याची प्रक्रिया वाहतूक खात्याकडून होते व त्यामुळे या गोंधळात हे चालक अजूनही बिनधास्तपणे वाहने हाकत असल्याची माहितीही मिळाली आहे. दरम्यान, वाहतूक अधीक्षक अरविंद गावस यांनी वेळोवेळी अपघातप्रवण क्षेत्र व इतर रस्त्यांची दुरुस्ती किंवा अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला प्रस्ताव पाठवले आहेत.गेल्या २००९ साली एकूण २१५ प्रस्ताव वाहतूक अधीक्षकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला पाठवले असले तरी त्याची पूर्तता करण्यास सा.बां.खात्याकडून विशेष तत्परता दाखवली जात नाही,असेही कळते.
वाहतुकीत शिस्त येण्यासाठी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याकडेच वाहतूक पोलिसांचे जास्त लक्ष राहिले आहे. गेल्या २००९ साली उत्तर गोव्यात १ कोटी ७६ लाख ३७ हजार ३५० तर दक्षिण गोव्यात १ कोटी २२ लाख ८८ हजार ०५० रुपये विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वसूल करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने अतिवेगासाठी ८,७९,००० रू.(उत्तरगोवा),४,४८, ३०० रू. (दक्षिणगोवा)हेल्मेटशिवाय प्रवासासाठी ३९,४८,८५० रू.(उत्तरगोवा)३५,२४,७०० रू.(दक्षिणगोवा), नोपार्किंग क्षेत्रात वाहन पार्क करणे- २,६६,४०० रू.(उत्तरगोवा) १,६६,९०० रू. (दक्षिणगोवा), मद्यसेवन करून वाहन चालवणे - २०, ००० रू. (उत्तरगोवा), ९६, २०० रू. (दक्षिणगोवा), बेदरकारपणे वाहन चालवणे - २२, ३०, ३५० रू. (उत्तरगोवा), १२, ३४, ८५० रू. (दक्षिणगोवा) आदी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
Tuesday, 27 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment