म्हापशातील व्यापारी संघटनेच्या पत्रपरिषदेत आरोप
आराखडा रद्द न केल्यास
व्यापारी रस्त्यावर उतरतील
मार्केटचे अस्तित्व धोक्यात
म्हापसा, दि. २९ (प्रतिनिधी): पोर्तुगीज काळापासून अस्तित्वात असलेल्या म्हापसा मार्केट प्रकल्पाचा नवीन आराखडा तयार केला गेला असून हा २०११ बाह्य विकास आराखडा (ओडीपी) म्हणजे मोठमोठ्या बिल्डरांना शेतजमीन गिळंकृत करता यावी म्हणून रचलेला डाव आहे; या आराखड्यामुळे म्हापसा मार्केटचे अस्तित्वच धोक्यात आले असून त्यामुळे म्हापशातील व्यापाऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच हा आराखडा रद्द केला नाही तर सर्व व्यापाऱ्यांना एकजुटीने रस्त्यावर उतरावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा अखिल गोमंतकीय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नारायण कारेकर यांनी म्हापसा येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
अखिल गोवा व्यापारी संघटना आणि म्हापसा व्यापारी मार्केट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने काल रात्री ८.३० वा. घेतलेल्या पत्रकार परिषदेत कारेकर बोलत होते.
श्री. कारेकर पुढे सांगितले की, आजपर्यंत केवळ म्हापशातीलच शेतजमिनी बिल्डरांच्या वक्रदृष्टीपासून शाबूत राहिल्या आहेत. म्हापसा शहराचा बाह्य विकास आराखडा तयार करताना त्यात वीस मीटरचा रस्ता दाखवण्यात आला आहे; पण गटारे आणि नाले मात्र दाखवण्यात आलेले नाहीत. मार्केट इमारतींमधील अंतर १३.५ मीटर एवढे आहे तर रस्ता सुमारे ८ ते ९ मीटरचा आहे. या नवीन आराखड्याप्रमाणे जर २० मीटरचा रस्ता तयार करण्यात आला तर मार्केटमधील पारंपरिक दुकाने पाडावी लागणार आहेत. पोर्तुगीज राजवटीत म्हापसा शहर सर्वांगाने विचार करूनच बांधण्यात आले होते, असा दावा त्यांनी यावेळी केला.
काही संधीसाधूंनी स्वार्थासाठीच सदर आराखडा तयार केला आहे. गटारे, नाले आदी आराखड्यात न दाखवणे म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरते आहे. यातून पालिका मंडळ म्हापसावासीयांना अंधारात ठेवूनच निर्णय घेते, हेच स्पष्ट होत आहे. कोमुनिदादच्या जागा हडप करून संपल्यामुळे आता शेतीत कॉंक्रीटची जंगले उभी करण्याचाच हा कुटील डाव आहे, असाही आरोप यावेळी श्री. कारेकर यांनी केला व हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तसेच शेतजमीन वाचवण्यासाठी व्यापारी संघटनांनी आणि नागरिकांनी एकत्रितपणे याविरोधात आंदोलन छेडले पाहिजे व हा आराखडा कायमचाच रद्द करायला संबंधितांना पाडले पाहिजे असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत यशवंत गवंडळकर, प्रकाश डांगी, रामा राऊळ, अब्दुल अझीझ, उदय वेंगुर्लेकर , अजित मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Friday, 30 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment