Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 26 April 2010

राजकारण्याच्या हॉटेल इमारतीचा स्लॅब कोसळला; कामगार जखमी

- काहीच घडले नसल्याचा दावा
- पत्रकारांशी लपवाछपवी
- छायाचित्रकाराला दटावले

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): मिरामार येथे एका बड्या राजकारण्याचे बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलचा स्लॅब कोसळल्याने तीन कामगार जखमी झाल्याची माहिती हाती लागली असून सदर राजकारण्याने आपला दबाव वापरून कोणतीही पोलिस तक्रार होणार नाही, याची खबरदारी घेतली. या घटनेची आपल्याला माहिती मिळाली होती, परंतु या बांधकामाच्या मालकाने किंवा कामगार कंत्राटदाराने कोणतीही माहिती पुरवली नसल्याने त्याठिकाणी जाणे योग्य नसल्याने आपण तेथे गेलो नाही, असे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.
आज दुपारी सुमारे १ च्या दरम्यान ही घटना घडली. मिरामार येथील विज्ञान केंद्रापासून काही अंतरावर हे बांधकाम सुरू होते. आज सकाळी या दुमजली इमारतीवर स्लॅब घालण्याचे काम हाती घेण्यात आले होते. दुपारी जवळ जवळ हे काम पूर्ण होत आले असताना अचानक रस्त्याकडेचा भाग कोसळल्याने तीन कामगार जखमी झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच काही पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी संबंधित राजकारण्याच्या काही लोकांनी या पत्रकारांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केले. तसेच, हा स्लॅब पडलेला नसून तो आम्ही स्वतः पाडलेला आहे, असा दावा केला. मात्र ज्यावेळी काही छायाचित्रकारांनी स्लॅबचे छायाचित्र घेतले असता त्या ठिकाणी असलेल्या गटाने त्या छायाचित्रकारांना फोटो घेण्यास मज्जाव केला. परंतु, त्यांच्याकडून होत असलेल्या कोणत्याही दबावाला बळी न पडता घटनास्थळाचे फोटो घेण्यात आले. त्यामुळे एकाने त्या छायाचित्रकाराचा कॅमेरा हुसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात आपण गोत्यात येऊ, अशी चाहूल लागताच या गटातील एका व्यक्तीने संबंधित राजकीय नेत्याशी दूरध्वनी वरून चर्चा केला आणि त्यानंतर तेथून त्या छायाचित्रकारांना जाण्यास सांगितले.
या प्रकारानंतर, ते राजकीय प्रस्थ आपल्या समर्थकासह सायंकाळपर्यंत घटनास्थळी प्रत्यक्ष उभे होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांची कोणताही माहिती देण्यास त्यांनी यावेळी नकार दिला. तसेच त्यांना कोणत्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, याची माहितीही लपवण्यात आली. इमारतीचा कोसळलेल्या भाग झाकून ठेवण्यात आला आहे.

No comments: