Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 26 April 2010

सांताक्रुझचे दोघे तरूण दूधसागर नदीत बुडाले

कुळे, दि. २५ (प्रतिनिधी): कुळे येथून चारशे मीटर अंतरावरील सिग्नल कोंड या ठिकाणी दूधसागर नदीवर आंघोळ करण्यास गेलेल्या दोघे तरुण बुडून मरण पावले. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वैभव सी. राणे (वय २६) व युवराज अयगळ (वय २६) अशी या तरुणांची नावे असून ते कुजिरा सांताक्रुझ येथील "चामुंडा अपार्टमेंट'मध्ये राहात होते. या दोघांच्या मृत्युमुळे सांताक्रुझ परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे.
आज रविवार असल्यामुळे या परिसरात सहलीसाठी अनेक लोक आले होते. वैभव आणि युवराज हे ज्या आंघोळीसाठी नदीत उतरले आणि ज्या ठिकाणी खोल पाणी आहे तेथे जाऊन बुडाले. त्यांना पाण्याचा अंदाजच आला नाही. हे दोघेही अचानकपणे दिसेनासे झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. त्यामुळे तेथे असलेल्या अन्य लोकांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढले. मात्र दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला होता.
सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे या परिसरात सहलीसाठी लोकांचे लोंढे सातत्याने येत आहेत. तेथील नदीवर पाणी पुरवण्याचा पंपही उपलब्ध आहे. मात्र तेथे येणाऱ्या मंडळींवर नियंत्रण ठेवणारी कसलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने अशा घटना सातत्याने घडत आहेत. तसेच नदीमध्ये प्लॅस्टिक, टाकाऊ वस्तू, काचा आदी वस्तू टाकण्यात येत असल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. यासंदर्भात पर्यटक आणि स्थानिकांनाही शिस्त लावण्याची गरज असल्याची मागणी केली जात आहे. तथापि, सरकारकडून त्याची दखलच घेतली जात नाही. निदान आता तरी सरकारने या बाबतीत तातडीने हालचाली कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

No comments: