Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 30 April 2010

भाजपच्या प्रशासन विभागाचे पर्रीकर राष्ट्रीय निमंत्रक

पणजी, जि. २९ (प्रतिनिधी): गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भारतीय जनता पक्षाच्या "प्रशासन' विभागाचे राष्ट्रीय निमंत्रक म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी पक्षाने देऊ केलेले ज्येष्ठ महासचिवपद काही व्यक्तिगत अडचणींमुळे आणि स्थानिक राजकीय जबाबदाऱ्यांमुळे श्री. पर्रीकर यांनी सविनय नाकारले होते. परंतु, प्रशासनातला त्यांचा दांडगा अनुभव आणि त्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन शेवटी पक्षाने ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी श्याम जाजू यांनी आज ही निवड जाहीर केली.
भारतीय जनता पक्षाचे ज्या ज्या राज्यामध्ये सरकार आहे तेथील प्रशासकीय कार्यक्षमता वाढविणे, सामान्यांच्या हितासाठी नवीन योजना व कार्यक्रम राबवणे, त्यांच्या हितासाठी प्रशासकीय कार्यपद्धती अधिक सुटसुटीत करणे अशा अनेक गोष्टींसंदर्भात संबंधितांना मार्गदर्शन करणे ही या विभागाची प्रमुख जबाबदारी असेल. पर्रीकरांच्या काळात गोव्याला उच्च कोटीतील दर्जेदार सुविधा, अत्यंत स्वच्छ व कार्यक्षम प्रशासन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गोव्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही लोकप्रिय ठरलेल्या जनहिताच्या कल्याणकारी योजना मिळाल्या होत्या. त्यांच्या या कुशलतेचा, अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा फायदा पक्षाची सत्ता असलेल्या इतर राज्यांनाही मिळावा, असा त्यांच्या या निवडीमागे हेतू आहे.
पर्रीकर यांच्या या निवडीमुळे गोव्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे पसरले असून पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांचे त्याबद्दल त्यांनी आभारही मानले आहे. पक्षाचे सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे पर्रीकरांच्या निवडीची ही माहिती दिली.

No comments: