Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 27 April 2010

कवी पुष्पाग्रज यांची कविता परमतत्त्वाचा शोध घेणारी : डहाके

'शांती अवेदना'चे थाटात प्रकाशन
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): कवी पुष्पाग्रज यांची कविता परमतत्त्वाचा शोध घेणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ तथा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविवर्य वसंत आबाजी डहाके यांनी केले. "शांती अवेदना' या कवितासंग्रहातून कवीने माणसाच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रश्न माणसाच्या जीवनाशी निगडीत असतात पण त्यांचे विश्लेषण करता येत नाही. अशा व्यक्तींकडे पाहण्याची दृष्टी आपुलकीची असावी लागते. याच आपुलकीने कवी आपल्या चिंतनातून परमतत्त्वाचा शोध घेत असतो, असेही उद्गार श्री. डहाके यांनी काढले.
गोमंतकीय कवी अशोक नाईक तुयेकर ऊर्फ पुष्पाग्रज यांच्या "शांती अवेदना' या तिसऱ्या कविता संग्रहाचे प्रकाशन आज कविवर्य वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले. गोमंतक साहित्य सेवक मंडळ, कोकण मराठी परिषद व ग्रंथाली प्रकाशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मिनेझिस ब्रागांझा सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कोकण मराठी परिषदेचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप, प्रसिद्ध रंगकर्मी डॉ. अजय वैद्य, कवी विष्णू सूर्या वाघ, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष सुरेश नाईक व कवी पुष्पाग्रज उपस्थित होते. "चित्रलिपी' या कविता संग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार २००९ साली प्राप्त झाल्यानंतर या सोहळ्यानिमित्त खास उपस्थिती लाभलेल्या कविवर्य वसंत आबाजी डहाके यांचा यावेळी ऍड. खलप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व श्री सातेरी देवीच्या मंदिराची खास चित्रकृती प्रदान करून सत्कार करण्यात आला. श्री. डहाके यांच्या हस्ते पुष्पाग्रज यांच्या "शांती अवेदना' या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले.
कवी पुष्पाग्रज यांचा हा कविता संग्रह तब्बल पंधरा वर्षानंतर येत आहे व त्यामुळे यापूर्वीचा "कॅलिडोस्कोप' व "नन्रुख' या कविता संग्रहांची चौकट कवीने मोडली आहे हे निश्चित, असेही यावेळी बोलताना श्री. डहाके म्हणाले.
सुरुवातीस सुरेश नाईक यांनी प्रास्ताविक केले. कवी विष्णू सूर्या वाघ यांनी सत्कारमूर्ती वसंत आबाजी डहाके यांच्या गौरवपर भाषणात श्री. डहाके हे नवकवींसाठी दीपस्तंभ असल्याचे उद्गार काढले. डॉ. अजय वैद्य यांनी "शांती अवेदना' संग्रहातील काही निवडक कवितांचे आपल्या खास शैलीत सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी बोलताना ऍड. खलप म्हणाले की, कवी पुष्पाग्रज यांनी आपल्या कवितांतून सदोदित आपल्या गावच्या व खास करून आपल्या अवतीभवतीच्या गोष्टींचा केलेला उल्लेख प्रकर्षाने जाणवतो व या परिसराशी त्यांचे नाते पटवून देतो. त्यांनी स्वतः आयुष्यात पार केलेल्या खडतर प्रवासाचीही झुळूक त्यांच्या साहित्यातून प्रकट होते, असेही ते म्हणाले.
कवी पुष्पाग्रज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा कवितासंग्रह प्रत्यक्षात येण्यासाठी रामकृष्ण नायक व गं्रथाली प्रकाशन यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करून घेण्यासाठी सुदेश आर्लेकर व उमेश बाणस्तारकर यांनी घेतलेल्या कष्टांचाही त्यांनी खास उल्लेख केला. आपल्या या संग्रहाचे रसिक भरभरून स्वागत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन किशोर नाईक गांवकर यांनी केले.

No comments: