Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 27 April 2010

कोसळलेल्या स्लॅबप्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद

पणजी पोलिसांकडून 'सुओमोटो' दखल
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): मिरामार येथे काल दुपारी "स्लॅब' कोसळून जखमी झालेल्या दुर्घटनेची पणजी पोलिसांनी "सुओमोटो' दखल घेत बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद केला केला आहे. त्याचप्रमाणे, कंत्राटदार बसवराज इरप्पा ईराबेल याला भा. दं. सं. ३३७ कलमानुसार अटक करून नंतर सायंकाळी जामिनावर त्याची सुटका करण्यात आली, अशी माहिती पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली. मात्र, हे बांधकाम कोणाचे आहे, याची माहिती मिळाली नसून ती पणजी महापालिकेकडून मिळवली जाणार असल्याचे श्री. चोडणकर यांनी सांगितले.
अधिक माहितीनुसार, काल दुपारी मिरामार येथे सुरू असलेल्या बांधकामाचा "स्लॅब' कोसळल्याने तीन कामगार जखमी झाले होते. यात मिथुन शेख (२४), हनुमंत गवंडगीर (२०) व हनिफ शेख (२०) हे जखमी झाले होते. सदर दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आज सकाळी वर्तमानपत्रांतून यासंबंधी माहिती छायाचित्रासह प्रसिद्ध झाल्याने त्याची "सुओमोटो' दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सदर बांधकाम हे एका बड्या राजकीय नेत्याचे असल्याची माहिती मिळाली आहे. या विषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक रामनाथकर कळंगुटकर करीत आहेत.

No comments: