स्वयंसेवी संघटनांच्या एकत्रित बैठकीत पुढाकार
मडगाव दि. २५ (प्रतिनिधी): गोव्यातील राजकीय घडामोडी व त्यात जाणारा गोमंतकीयांच्या हिताचा बळी यामुळे व्यथित झालेल्या विविध बिगरसरकारी संघटना व ज्येष्ठ नागरिकांनी आज येथे" पीपल्स फॉर पॉलिटिकल सॅनिटी' च्या झेंड्याखाली एकत्र येऊन राजकारण्यांच्या तावडीतून गोव्याला वाचवायचे असेल तर राज्यात संपूर्ण राजकीय परिवर्तन घडवून आणण्याची हाक दिली व त्यासाठी आजपासूनच कार्यरत होण्याचा संकल्प सोडला.
गत आठवड्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोमंतकीय पॉप गायक रेमो फर्नांडिस याने गोव्यातील राजकारण्यांनी राज्याच्या केलेल्या दुर्दशेबद्दल संताप व्यक्त करताना त्यांना एका होडीत बसवून अरबी समुद्रात नेऊन बुडविण्याची गरज प्रतिपादन केली होती, त्यापाठोपाठ विविध बिगर सरकारी संघटनांच्या झालेल्या या बैठकीला राजकीय वर्तुळात महत्त्व दिले जात आहे.
येथील ग्रेस चर्च सभागृहात झालेल्या या बैठकीत येत्या निवडणुकीत सर्व चाळीसही मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. त्यासाठी पंधरवड्याने ९ मे रोजी सायंकाळी ४ वाजता याच ठिकाणी पुन्हा जमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या बैठकीत निश्चित कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे.
सत्ता ही कोणाचीच मिरासदारी होऊ नये, मतदारांचे त्यावर संपूर्ण नियंत्रण असावे, प्रशासकीय व राजकीय भ्रष्टाचारावर लोकांचा अंकुश असावा आदी विचार यावेळी व्यक्त करून त्यासाठी काही उपाय सुचविण्यात आले. गोव्याने जनमत कौल व राजभाषा अशा दोन प्रश्र्नांवर विजय मिळविलेला असला तरी आज पन्नास वर्षांनंतरची स्थिती गोव्यासाठी आशादायी नाही असा विषाद यावेळी व्यक्त केला व त्यासाठी काही ठरावही संमत केले गेले.
त्यांत गोव्यासाठी खास दर्जा द्यावा, उच्चपदावरील भ्रष्टाचार तपासण्यासाठी लोकायुक्तांची नियुक्ती व्हावी, एकदा निवडून आलेल्याला परत विधानसभा निवडणूक लढविण्याची मुभा असू नये, बेकायदा खाणी बंद कराव्यात या मागण्यांचा समावेश आहे.
अन्य ठरावात अकार्यक्षम आमदाराला माघारी बोलावण्याची मुभा असावी, पोलिस सुधारणा कायद्याची त्वरित अंमलबजावणी केली जावी, दक्षता व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागांनी सरकारी कचेऱ्यात आकस्मिक तपासणी करावी, गरजेच्या वस्तूंच्या दरांवर सरकारचे नियंत्रण असावे, नियोजन नसलेल्या विकास प्रकल्पांना परवाने देऊ नये, एका अधिकाऱ्याकडे अनेक पदांचा अतिरिक्त पदभार देण्याचे प्रकार बंद करावेत, डोंगर, टेकड्या, शेती, खाजने, झरे, कोमुनिदाद जमिनी, वाळूच्या टेकड्या यांचे जतन करावे, वाढते रस्ते अपघात टाळण्यासाठी त्यांचे मूळ कारण शोधून काढावे व त्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करावी यांचा समावेश आहे.
आजच्या बैठकीत गोवा सुराज , भारतीय पोप्युलर फ्रंट, युनायटेड गोवन्स वेल्फेअर फ्रंट, जय दामोदर संघटना, मडगाव सेवा असोसिएशन, गोंयकारांचो अरिष्ट आवाज, कलेक्टीव्ह पीपल्स व्हॉईस ऑफ साऊथ गोवा, माडेल सिटिझन्स फोरम, बायलांचो एकवट, शेतकारांचो एकवट, कोलवा नागरिक व ग्राहक मंच चे प्रतिनिधी उपस्थित होते.
चर्चेत डॉ. धुमे, इंजिनियर एम. कुलासो, दामोदर घाणेकर, फ्लोरियानो लोबो, जुझे डिसोझा, दोलोरोसा डिसिल्वा, इंडिथ आल्मेदा, झिनो कार्व्हालो, सोकोर डिसोझा, लॉरेल आब्रांचिस, महेश नायक, सईद इफ्तिकार, तेरेझिना फर्नांडिस, तिओ फर्नांडिस, क्रॉयडोन आल्मेदा, सोनिया व्हाज, रेसर आल्मेदा, राजेंद्र काकोडकर, जुझे मारिया मिरांदा यांनी भाग घेतला.
Monday, 26 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment