Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 1 May 2010

नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरविणाऱ्यांना अटक

दोन सीआरपीएफ जवानांचाही समावेश
लखनौ/नवी दिल्ली, दि. ३० : नक्षलवाद्यांना शस्त्रे आणि दारुगोळा पुरविण्याच्या आरोपावरून उत्तरप्रदेश एसटीएफने आज सहा जणांना ताब्यात घेतले असून अटक करण्यात आलेल्या या सहा जणांमध्ये सीआरपीएफच्या दोन जवानांसह एका निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे.
सीआरपीएफच्या ७६ जवानांची हत्या करुन दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी जो नरसंहार घडविला त्यात या काडतुसांचा वापर केला गेला असावा, अशी शंका व्यक्त झाली आहे. दरम्यान, प्राप्त झालेल्या एका माहितीच्या आधारेच ही कारवाई करण्यात आली आहे, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले.
मोरादाबाद, रामपूर आणि झांशी येथे शोध मोहीम राबवून पोलिसांनी केलेल्या या कारवाईदरम्यान विनोद पासवान आणि दिनेशसिंग या दोन सीआरपीएफच्या जवानांना अटक करण्यात आली आहे. सेवानिवृत्त उपनिरीक्षक यशोदानंद सिंग सीआरपीएफ आणि पीएसी (प्रादेशिक सशस्त्र दल) च्या तळावर जाऊन तेथून रिकामी काडतुसे गोळा करायचा. नंतर रामपूर येथे त्या काडतुसांमध्ये दारुगोळा भरून ती पुन्हा जिवंत केली जायची आणि नक्षलवाद्यांना त्याचा पुरवठा केला जात होता, असे एका सूत्राने सांगितले.
या अटकेसोबतच पोलिस पथकाने ५ हजार जिवंत काडतुसे, आयएनएसएएस रायफल्सची १६ मॅगझीन, .२५ बोअर गन्स, एसएलआर आणि एके ४७ तसेच २४५ किलो रिकामी काडतुसे जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सीआरपीएफच्या दोन जवानांना तातडीने निलंबित करण्यात आले असून त्यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
आम्ही त्या दोन्ही जवानांना तातडीने निलंबित केले असून त्यांच्याविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी केले आहेत. या प्रकरणी आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना सर्व ती मदत करण्याचा निर्णयही घेतला आहे, असे सीआरपीएफचे महासंचालक विक्रम श्रीवास्तव यांनी सांगितले.
नंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना उ. प्र. पोलिसचे अतिरिक्त महासंचालक ब्रिजलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रांचे साहित्य, मोबाईल फोन्स आणि सुमारे १.७६ लाख रुपये रोख राशी जप्त केली आहे.
हे एक मोठे नेटवर्क असून गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून ते कार्यरत होते. यात आणखी काही लोक सहभागी आहेत काय, याचा शोध अटक करण्यात आलेल्या चौघांच्या चौकशीनंतर लागू शकतो, असेही ते म्हणाले.

अजमेर स्फोटाच्या संशयिताला अटक
पोलिस कोठडीत रवानगी

अजमेर, दि. ३० >: २००७ साली अजमेर दर्ग्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचा संशयित आरोपी असलेल्या देवेंद्र गुप्ता याला आज राजस्थानच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. अटक करून त्याला आज अजमेर न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याची बारा दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अजमेरच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर गुप्ता याला उभे करण्यात आले होते. तेव्हा पोलिसांनी त्याच्या चौकशीसाठी बारा दिवसांची पोलिस कोठडी मागून घेतली. येत्या १२ मे रोजी त्याला पुन्हा न्यायालयासमोर सादर केले जाईल, असे एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अजमेरच्या बिहारीगंज येथील रहिवासी असलेल्या देवेंद्र गुप्ताला राजस्थानच्या एटीएसने बुधवारी रात्री त्याच्या घरून ताब्यात घेतले. तो आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला अटक केली, असे सूत्राने सांगितले.
गुप्ता याचा अभिनव भारत या संघटनेशी संबंध आहे आणि २००७ साली अजमेरस्थित ख्वाजा मोईनुद्दिन चिस्तीच्या दर्ग्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटातील तो संशयित आरोपी आहे. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि ३० जखमी झाले होते, असेही या सूत्राने सांगितले.
मालेगाव स्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासोबत गुप्ताचे काही संबंध आहे काय, हे सुद्धा पोलिस तपासून पाहणार आहे. गुप्ता हा झारखंडमध्ये राहात होता आणि तो बुधवारी अजमेरला आला होता. स्फोट घडलेल्या ठिकाणी सापडलेल्या सिम कार्डमुळे पोलिसांना गुप्तापर्यंत पोहोचता आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भाजपा सरकारला समर्थन;
झाजमं आमदाराचा नकार

रांची, दि. ३० : झारखंड जनाधिकार मंचचे एकमेव आमदार असलेले बंधू तिर्की यांनी झारखंडमध्ये भाजपाने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर आपण समर्थन देणार नाही, असे सांगितले आहे.
आपण शिबू सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला याआधी समर्थन दिले होते, भाजपाला नाही, असे सांगून तिर्की म्हणाले की, याबाबतचा अंतिम निर्णय आमच्या पक्षाच्या बैठकीनंतर घेतला जाईल. लोकसभेत शिबू सोरेन यांनी कपातप्रस्तावाच्या विरोधात मतदान केल्यामुळे नाराज झालेल्या भाजपाने झामुमोसोबतची युती तोडली आणि त्यामुळे झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय पेच निर्माण झाला आहे. आता भाजपाने झामुमोचे समर्थन मागे घ्यायचे की नाही, या निर्णयावर फेरविचार सुरू केला आहे. झामुमोनेही युती कायम ठेवून भाजपाचा मुख्यमंत्री करावा, अशी मागणी पुढे रेटली आहे.

No comments: