Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 26 November 2009

राष्ट्रपतींची 'सुखोई'तून चित्तथरारक भरारी

पुणे, दि. २५ (प्रतिनिधी): भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आज ध्वनीपेक्षाही अधिक गतीने जाणाऱ्या सुखोई ३० या लढाऊ विमानाच्या फेरफटक्यांचा अनुभव घेतला. हवेत पंचेचाळीस अंशातून उड्डाण करणारे हे संरक्षण दलात हवेतून हवेतील लक्ष्यावर किंवा हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्राचा मारा करण्यासाठी वापरले जाते. अशा विमानातून चौऱ्याहत्तर वर्षीय राष्ट्रपतींनी चोवीस मिनिटांचा दौरा केला. पुण्यातील लोहगाव विमानतळावरून उड्डाण केल्यावर उत्तरेच्या दिशेने झेपावलेले हे फक्त दोन व्यक्तींनाच बसण्याची क्षमता असलेले विमान आळंदी, देहूवरुन राजगुरुनगरच्या आकाशक्षेत्रावरून पुढे गेले व उजवीकडे वळून शिरूर, उजनी धरण हा परिसर बघत बारामतीवरून भरारी घेत परतले. या मोहिमेत त्यांनी विमानाचे नियंत्रण, ते उजडीकडे वळवणे, डावीकडे वळविणे, खाली घेणे, वर घेणे या प्रक्रिया स्वत: केल्या. सुखोई विमान हे लढाऊ विमान असल्याने त्यानी विमानातच बसूनरडारवरून दूर अंतरावरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणे व हल्ला करण्याची यंत्रणा हाताळणे याचीही माहिती घेतली. सुखोई विमानातून उड्डाणाचा अनुभव घेणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या. यापूर्वी जून २००६मध्ये साडेतीन वर्षापूर्वी त्यावेळचे राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी असेच सुखोईमधून उड्डाण केले होते. या स्वनातीत विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.
सुखोईतून भरारी मारण्याच्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींचे काल दुपारी पुण्याला आगमन झाले. आज त्यांच्या या भरारीची नियोजित वेळ साडेनऊ वाजता होती. पण त्यांच्या आरोग्यतपासणीतील बारकावे व वारंवार विमानतपासणी या प्रक्रियेमुळे हे उड्डाण सकाळी अकरा वाजता झाले. साडेनऊ वाजता राष्ट्रपतींचा ताफा लोहगाव विमानतळावर पोहोचला. त्यांना प्रथम वायुदलाच्या एका तुकडीने सलामी दिली. सुखोई ३०एम के आय हे विमान ताशी सव्वीसशे किमी वेगाने उडण्याच्या क्षमतेचे असल्याने व पहिल्या दहा सेकंदात ताशी अडीचसे किमीपासून ते ताशी आठशे किमी वेगाने वर जात असल्याने चौऱ्याहत्तर वर्षीय राष्ट्रपतींच्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून गुरुत्वाकर्षणाच्या प्रचंड दबावाचा प्रकृतीवर परिणाम होऊ नये, अशा परिणामाचा सूट घालण्यात आला. सर्वसाधारणपणे सहावारी साडी, डोक्यावरून पदर व त्या पदराचे एक टोक डाव्या हातात पकडलेले अशा शालीन चर्येतील राष्ट्रपतींनी जेंव्हा लष्करी पेहेरावाचा तो बुटोई सूट घातला व सेनादलाच्या जवानांशी हात हालवत सुखोई विमानात स्थानापन्न झाल्या. विंग कमंाडर एस साजन हे त्या विमानाचे चालक होते. राष्ट्रपतींचे वय लक्षात घेऊन आज विमान फक्त साडेसातशे किमी गतीने नेण्याचा व अन्यथा पन्नास हजार फुटावरून जाणाऱ्या या विमानाने फक्त आठ हजार फुटावरून जाण्याचा निर्णय हवाई दलाने घेतला होता.
राष्ट्रपती या देशाच्या तिन्ही सेनादलाच्या सर्वोच्च प्रमुख असतात, त्यामुळे त्यांच्या विमानाची तपासणी, त्यंाची तपासणी व अन्य यंत्रणंाची तपासणी ही प्रक्रिया वारंवार करण्यात येत होती. अकरा वाजता त्यांच्या विमानाने उड्डाण केल्यावर त्या सुखोईविमानाच्या दोन्ही बाजूने दोन सुखोई विमाने उडत होती. त्या विमानातील विंग कमांडर हे राष्ट्रपतींशी संवाद करू शकत होते, आता आपले विमान कोठे आहे, याची माहिती देत होते. तसेच लष्करी काटेकोरपणा व क्षेपणास्त्रे यांचीही माहिती देत होते. राष्ट्रपतींनी उड्डाण केल्यावर त्याच्या सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला असलेल्या सुखोईविमानाच्या पायलटांकडे हात हलवूनही दाद दिली. राष्ट्रपती प्रतिभाताई या राष्ट्रीय पातळीवर टेनिस खेळलेल्या क्रीडापटू आहेत व त्या टेनिससूटमध्ये वावरल्याही आहेत. तरीही आजचा त्यांचा बुटोई सूटमधील पेहेराव हा नवीन होता.
अकरा वाजता उड्डाण केलेले त्यांचे सुखोई विमान अकरा वाजून चाळीस मिनिटांनी परत जमिनीवर टेकले व पुढे सहा मिनिटांनी ते टॅक्सी वे वरून परत मूळच्या जागेवर आले. वरीष्ठ वायूदल अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा तेथे क्षेपणास्त्राच्या कांही बाबीबाबत माहिती दिली. त्या खाली आल्यावर त्यंानी पुन्हा यात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांशी, पायलटांशी व कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन केले. त्यानंतर लष्करी डॉक्टरांच्या पथकाने आरोग्य तपासणीसाठी त्यांना विशेष दालनात नेले. कांही मिनिटे विश्रांती, नंतर तपासणी, थोडेसे पेयपान करून नंतर बारा वाजून पन्नास मिनिटांनी त्या वायुदलाच्या ऑफिसर्स मेसमध्ये प्रकारांना मुलाखत देण्यासाठी आल्या.
"जगातील एक मोठे उपखंड असलेल्या या मोठया देशातील लष्करी यंत्रणा किती सुसज्ज व अद्ययावत आहे, याचाच मी अनुभव घेतला, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रचंड वेगाने जाणाऱ्या लढाऊविमानातून भरारी हा मला व्यक्तीश: तर चांगला अनुभव होताच पण जबरदस्त क्षमता असलेल्या आपल्या वायुदलाच्या कामाचीही प्रचीती आली.
भारतीय महिला राष्ट्रपतींना हा अनुभव प्रथम मिळत आहे, त्यादृष्टीने आपण काय सांगाल व तरुण मुलींना काय सल्ला द्याल, याबाबत विचारता त्या म्हणाल्या, "भारतीय महिलांना कोणतेही क्षेत्र न हाताळण्यासारखे नाही, हे तरुण मुलींनी पुन्हा एकदा लक्षात ठेवावे. आज शेकडो मुली पायलट म्हणून यशस्वीपणे काम करत आहेत. संरक्षणदलातही आहेत. सीमेवरही जाण्यासाठी तयार आहेत. त्यांनी अशा सुखोईसारख्या विमानाचे प्रत्यक्ष लढाईत चालन करावे का याबाबत तज्ञांची तुकडी अभ्यास करत आहेत. पण एक अनुभव मी संागते की, तरुण पिढीने भरारी घ्यावी, यासाठी विशाल आकाश त्यांची वाट बघते आहे.

No comments: