Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 26 November 2009

गुंजीमळ प्रकल्पाला पर्यायी जागा देण्याबाबत एकमत

तोडग्यासाठी पर्रीकर यांचा पुढाकार
सांगे, दि. २५ (प्रतिनिधी): विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पुढाकार घेऊन बोलावलेल्या बैठकीत आज सांगे पालिका क्षेत्रातील गुंजीमळ येथील वादग्रस्त प्रकल्पावर तोडगा निघाला आहे. या बैठकीत पर्यायी जागेसंबंधी एकमत झाल्याने आता हा वाद मिटल्यात जमा असून त्या परिसरातील अशांत वातावरण निवळणार आहे, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
आज पर्वरी येथे विधानसभा संकुलात श्री. पर्रीकर यांनी घेतलेल्या बैठकीला नगरविकास मंत्री ज्योकीम आलेमाव, सांगेचे आमदार वासुदेव मेंग गावकर, सांगेच्या नगराध्यक्ष हर्षा संभारी, नगरसेवक, सांगे भाजयुमोचे अध्यक्ष सुप्रज नाईक तारी, कचरा प्रकल्प विरोधी शिष्टमंडळ उपस्थित होते.
सांगे पालिकेच्या हिंदू स्मशानभूमीजवळ गुंजीमळ येथे प्रकल्प उभारण्यास मुगोळी, कामतीनाग, तारीपांटो, आमडई, बोंदुर्ले, कुमठामळ व मारांगण या सात गावच्या लोकांनी सुरवातीपासूनच विरोध केला होता. हा प्रकल्प इतरत्र हलविण्याबाबत आजच्या बैठकीत विचार करण्यात आला. नियोजित प्रकल्पाला पर्यायी जागा निवडण्यासंबंधी आजच्या बैठकीत चर्चा होऊन दुसऱ्या जागेबाबत एकमत झाले, असे सांगण्यात आले. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती आमदार गावकर यांनी दिली. याचप्रश्नी उपनगराध्यक्षांनी एका महिलेला धक्काबुक्की केल्याने सांगे परिसरात काल तंग वातावरण निर्माण झाले होते.

No comments: