Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 23 November 2009

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आंदोलनाची दिशा ठरणार

कर्मचारी वेतनवाढीत भेदभाव

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - सरकारी सेवेतील मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल आज सरकारी कर्मचारी संघटनेने तीव्र संताप व्यक्त करून मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतरच आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेतला. राष्ट्रपतींच्या गोवा दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नसल्याने येत्या दोन दिवसांत ही भेट घेतली जाणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांनी सांगितले. पाटो पणजी येथे असलेल्या संघटनेच्या कार्यालयात सर्व तालुका अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक झाली.
सरकारच्या आदेशानुसार ५ हजार २०० रुपये असलेल्याची वेतनश्रेणी ९ हजार ३०० रुपये केली आहे. तर, २८०० रुपये असलेल्याची ५ हजार ५०० रुपये येवढी केली आहे. ही वाढ काही ठराविकच कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. त्याचे कोणतेच कारणही सरकारने स्पष्ट केलेले नाही. वेतनश्रेणीत एवढी वाढ करण्याची सरकारची तयारी असल्यास ही वाढ सर्वांनाच दिली जावी, असे श्री. शेटकर म्हणाले. याची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री कामत यांच्याशी संपर्क साधला असला त्यांनी आपल्याला याविषयी काहीच माहिती नसल्याचा आव आणला, असेही श्री. शेटकर यांनी सांगितले. सरकारी कर्मचारी संघटनेची आज झालेल्या सर्व तालुका प्रमुखांच्या बैठकीत या भेदभावाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

No comments: