Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 23 November 2009

आता खनिज वाहतूक समस्यांवर तोडग्यासाठी न्यायालयात याचिका

उसगाव बाजारकर मंडळाचा निर्णय

तिस्क-उसगाव,दि.२२ (प्रतिनिधी)- उसगाव वड येथील बाजारात खनिज माल वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव आज २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झालेल्या उसगाव बाजारकर मंडळाच्या खास बैठकीत घेण्यात आला. ही बैठक उसगाव वड येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली.
उसगाव भागातून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खनिज माल वाहतूक करावी, रात्रीच्या वेळी पूर्णपणे खनिज माल वाहतूक बंद करावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत खनिज माल वाहतूक बंद ठेवावी, टिपर ट्रकाच्या हौदाच्या समपातळीवर खनिज माल भरून वाहतूक करावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर करावी,असा ठराव यावेळी व्यापारी जिवबा फात्रेकर यांनी मांडला. त्या ठरावाला बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वाधिक व्यापाऱ्यांनी हात उंचावून अनुमोदन दिले. हा ठराव मंजूर झाल्याचे यावेळी बैठकीत जाहीर करण्यात आले. ३० नोव्हेंबर रोजी या संदर्भात याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी मुरा नाईक तसेच व्यापारी हरिश्चंद्र प्रभू व्यासपीठावर उपस्थित होते.
या ठरावावर चर्चा करण्यात आली. गावात उत्सवाच्या वेळीही खनिज माल वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी,असे यावेळी ठरले.
७ डिसेंबर २००८ रोजी सर्व संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना बाजारकर मंडळाने निवेदने सादर केली होती. परंतु त्यावर काहीच कारवाई होऊ शकली नाही. खनिज माती धुळीमुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होते. परंतु, अद्यापपर्यंत व्यापाऱ्यांना कुणीच नुकसान भरपाई दिलेली नाही,अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
प्रास्ताविक, सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन बाजारकर मंडळाचे अध्यक्ष दिनेश देसाई यांनी केले.

No comments: