Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 22 November 2009

पाकला हव्या असलेल्या कुख्यात दहशतवाद्याशीही हेडलीचे संबंध

मुंबई, दि. २१ : लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडलीचे पाकिस्तानातील बड्या लष्करी अधिकाऱ्यांसोबतच दहशतवादी संघटनांशीही नजिकचे संबंध असल्याचे उघड झाले आहे.
हेडलीचे, पाकिस्तानला हव्या असलेल्या अतिरेक्यांच्या यादीतील चौथ्या क्रमांकावर असलेल्या इलियास काश्मिरी या कुख्यात दहशतवाद्याशीही संबंध असल्याची माहिती गुप्तहेर संघटनांना मिळाली आहे.
काश्मिरी हलकत-उल-जिहाद-इस्लामी (हुजी) या दहशतवादी संघटनेसाठी आझाद काश्मीर तुकडीचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. याच काश्मिरीने २००३ मध्ये पाकचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावरही हल्ला केला होता. त्यानंतर त्याने भारतीय सीमेवरही चांगलाच धुडगूस घातला. तत्पूर्वी १९९८ मध्ये काश्मिरीला भारतीय सुरक्षा दलाने अटक करून पूंछ येथील तुरुंगात ठेवले होते. परंतु, दोनच वर्षांत तो तुरुंगातून पाकमध्ये पसार झाला. २००३ मध्ये मुशर्रफ यांच्यावर हल्ला केल्यानंतर तो भूमिगत झाला होता. मात्र, २००८ मध्ये पाकिस्तानातील लाल मशिदीवर त्याने हल्ला केला. येथून पुन्हा त्याच्या रक्तपाती कारवाया सुरू झाल्या.
सप्टेंबर २००९ मध्ये अमेरिकन विमानांच्या ड्रोन हल्ल्यात काश्मिरी मारला गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यावेळी हेडली व राणा यांनी एकमेकांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये या हल्ल्याचा संदर्भ आला होता. हुजीपासून फारकत घेत पाकच्या वायव्य सरहद्द प्रांतातील रमझाक भागात काश्मिरीने स्वत:चे ३१३ नामक युनिट सुरू केले होते.अत्यंत कडवा जिहादी असलेला काश्मिरीने लष्कर जे साध्य करू शकत नाही, त्यासाठी लढत असल्याचे हेडली व राणा यांचे मत होते.

No comments: