Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 27 November 2009

कोर्टाबाहेरच गुंडावर प्राणघातक हल्ला भरदिवसा पणजीत थरारनाट्य

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत आपला मंत्रिपदाचा दशकपूर्ती सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करीत असतानाच, नेमक्या त्याच दिवशी राजधानीत न्यायालयाजवळ हल्ला प्रकरण घडले आहे. आज दिवसाढवळ्या पणजी जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर जामिनावर सुटलेला गुंड मेहबूब मुल्ला ऊर्फ "बिच्चू' व त्याचा चुलत भाऊ रमजान मुल्ला या दोघांवर दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने प्राणघातक वार करून पलायन केले. यात बिच्चू याच्या डोक्यावर गंभीर जखम झाली असून त्याला त्वरित उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. बिच्चू याच्या डोक्यावर आणि पाठीवर असे सुमारे सहा वार करण्यात आल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी रक्ताचे डाग पडले होते तसेच त्याठिकाणी उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीवर रक्ताचे शिंतोडे उसळले होते. आज दुपारी सुमारे २.३५ वाजता ही घटना घडली. २.३० वाजता न्यायालयाचे दुसरे सत्र सुरू होण्याची वेळ असल्याने न्यायाधीश तसेच वकिलांची न्यायालयात येण्याची लगबग सुरू होती. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ माजला आणि सर्वांची धावपळ उडाली. पोलिसांनी पंचनामा करून दोघा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक तुषार लोटलीकर, रामनाथ कळंगुटकर यांनी भेट देऊ पाहणी केली. रात्री उशिरा दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
बिच्चू याच्या विरोधात न्यायालयात एका खटल्याची सुनावणी असल्याने त्याला हजर राहण्यासाठी तो न्यायालयात येत असताना न्यायालयाच्या बाजूलाच असलेल्या पणजी रेसिडेंन्सीच्या खाली बिच्चू आणि त्याच्या चुलत भावावर हल्ला करण्यात आला. एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ला करून पळून जाण्याच्या घाईगडबडीत असताना दोघेही हल्लेखोर रेसिडेन्सीच्या समोर असलेल्या पेट्रोल पंपच्या समोर दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडले. त्याही परिस्थितीत त्यांनी दुचाकी घेऊन तेथून पळ काढला. यावेळी तेथे असलेल्या सर्वांनी त्यांना पळून जाताना पाहिले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ८ मीटरवर पडलेला एक चॉपरही जप्त केला आहे. हा हल्ला झाला त्यावेळी न्यायालयाच्या आवारात अन्य एका खटल्यात उपस्थित राहण्यासाठी आलेला कुविख्यात गुंड आश्पाक बेंग्रे उभा होता. त्याने थेट न्यायालयातच धूम ठोकली, अशी माहिती तेथे उपस्थित असलेल्या वकिलांनी दिली.
राज्यात वाढत्या गुन्हेगारीने आज पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगत चक्क न्यायालयाच्याच आवारात प्राणघातक हल्ला करून न्यायव्यवस्थेला आणि पोलिस यंत्रणेला एकप्रकारे आव्हान दिले आहे. हल्लेखोरांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. दोघेही हल्लेखोर चिंबल येथे राहणारे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
अधिक माहितीनुसार, मार्च २००७ साली बिच्चू व त्याच्या अन्य साथीदारांनी एका बारमध्ये ज्योकिम मोन्तेंरो याच्यावर बिअर आणि सोडाच्या बाटल्यांनी प्राणघातक हल्ला चढवला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्या घटनेनंतर बिच्चू तसेच त्याचे अन्य साथीदार आसीफ अस्लम, शौकत शेख, शब्बीर गुजराती याच्या विरोधात जुने गोवे पोलिस स्थानकात ३०७ (प्राणघातक हल्ला) नुसार गुन्हा नोंद करून न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयात युक्तीवादाच्यावेळी हा हल्ला प्राणघातक नसून ज्योकीम मोन्तेरो केवळ गंभीर जखमी झाला होता, असा दावा करून ३०७ कलम न्यायालयातून रद्द करून घेण्यात आले होते. तसेच बिच्चू याला जामीनही मंजूर झाला होता. आज याच खटल्याची पुढील सुनावणी सुरू होती. त्यामुळे जामिनावर असलेला बिच्चू न्यायालयात हजर राहण्यासाठी आला होता.
------------------------------------------------------------------
हल्ला फिल्मी स्टाईलने...
इफ्फीनिमित्त पणजी शहरात कडेकोट सुरक्षा असतानाही खुलेआम फिल्मी स्टाईलने न्यायालयाजवळ खुनी हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोवा पोलिसांबरोबर निमलष्करी दलाच्या तीन कंपन्या पणजी शहरात गस्त घालत असतानाही अशा प्रकारे खुनी हल्ला करण्याचे धाडस गुन्हेगार करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तडीपार...
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला बिच्चू याच्यावर विविध पोलिस स्थानकात सुमारे सहा गुन्हे दाखल आहेत. जुने गोवे पोलिस स्थानकात ३, पणजी पोलिस स्थानकात १, म्हापसा १ व मायणा कुडतरी येथे १ अशी माहिती मिळाली आहे. तसेच, अनेक अनैतिक कृत्यात त्याचा सहभाग असल्याने राज्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिस खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता. गेल्या जानेवारी महिन्यात पाठवलेला हा प्रस्ताव अकरा महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात धूळ खात पडलेला आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळ तसेच मिरामार येथे भलत्याच मुलींकडे बोट दाखवून पर्यटकांकडून हजारो रुपये उकळण्याच्या धंद्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पणजी शहरात अशा प्रकारे पर्यटकांना लुटण्यासाठी तीन गट कार्यरत असून एका गटाने दुसऱ्या गटाचा प्रमुख असलेला बिच्चू याच्यावर हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: