Monday, 23 November 2009
जुने चित्रपटपोस्टर ठरले आकर्षण!
पणजीनगरी "इफ्फी'च्या दुनियेत
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - ९६वर्षांचा भारतीय चित्रपटाचा इतिहास सांगणारे सुमारे ३५० "पोस्टर' ४० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.
१९१३ ते आत्तापर्यंतचे हे पोस्टर भारतीय चित्रपट पुरातत्त्व विभागाचे भरत जाधव यांनी उपलब्ध केले आहेत. ९६ वर्षापूर्वी बनलेला चित्रपट राजा हरिश्चंद्र (१९१३), त्यानंतर, कल्याणचा खजिना (१९२४) आणि सती सावित्री (१९२७) या चित्रपटांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपट रसिकांना जुन्या जमान्यात फेरफटका मारायची संधी लाभली आहे.
या पोस्टरची जपणूक करणे हे आमचे मुख्य काम आहे. त्यामुळे मूळ पोस्टर आणलेले नसून त्याच पद्धतीने हुबेहूब बनवलेले पोस्टर आणले आहेत. ते मूळ पोस्टर सांभाळून ठेवण्यासाठीच आम्ही ते सहसा बाहेर काढत नसल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. मात्र हे पोस्टर मूळ पोस्टरप्रमाणेच बनवले असल्याचेही ते म्हणाले.
श्री. जाधव यांच्या या पुरातत्त्व विभागातील काही पोस्टरना पारितोषिकेही मिळालेली आहेत. "मीरा' "गुंज उठी शहनाई' यांना ही पारितोषिके मिळाली आहेत. या पोस्टरमुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास समजण्यास फायदा होतो. कला विभागाचे विद्यार्थी आजही आमच्याकडे हे पोस्टर पाहून शिकण्यासाठी येतात,असे त्यांनी यावेळी सांगितले. या विभागात पोस्टर प्रमाणेच जुन्या चित्रपटांचे "रील'ही जपून ठेवण्याचे काम पाहिले जाते. यासाठी मृणाल सेन, श्याम बेनेगल हे परिश्रम घेत असल्याचे ते म्हणाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment